जमिनीचा वाद अन् राजकीय दबाव , राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या जाचाला कंटाळून सादिक कपूर यांनी जीवनयात्रा संपवली
पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा रणसंग्राम सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख शेख यांच्या जाचाला कंटाळून सादिक उर्फ बाबू कपूर या तरुणाने आपल्या कार्यालयात आत्महत्या केली आहे. ५ गुंठे जमिनीच्या वादातून राजकीय दबावाचा वापर करून मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप मृताने मागे ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.
सादिक कपूर यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी केवळ चिठ्ठीच लिहिली नाही, तर आपल्या हातावरही काही मजकूर लिहून ठेवला होता. पोलिसांना घटनास्थळी तब्बल ३० पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या पत्रात सादिक यांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचला असून, फारुख शेख यांच्या त्रासामुळे आपण जीवन संपवत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या सुसाईड नोटमध्ये इतरही काही जणांच्या नावांचा समावेश असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
५ गुंठे जमिनीचा वाद आणि छळ
मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद नगर भागातील एका ५ गुंठे जमिनीच्या तुकड्यावरून सादिक आणि फारुख शेख यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून सादिक यांना वारंवार धमकावणे आणि मानसिक त्रास देणे सुरू होते. राजकीय सत्तेचा वापर करून सादिक यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न झाले, ज्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आपल्या कार्यालयातच आयुष्य संपवले.
लष्कर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ३० पानांची सुसाईड नोट आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी फारुख शेख यांच्यासह अन्य संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारावरच आत्महत्येसारख्या गंभीर घटनेचे आरोप झाल्यामुळे पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात तणावाचे वातावरण असून, विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी गटावर टीकेची झोड उठवली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सुसाईड नोटमधील प्रत्येक नावाचा तपास केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


























