देहुरोडला ‘उबाठा’चे पारडे रिकामे; भरत नायडूंचा ‘धनुष्यबाण’ हाती घेताच शहरात राजकीय भूकंप


 

देहुरोड शहरात शिवसेना शिंदे गटाला मोठे बळ; ५० हून अधिक कार्यकर्त्यांसह अधिकृत पक्षप्रवेश 

देहुरोड : चंद्रशेखर पात्रे 

राजकीय वर्तुळात कधी काय घडेल याचा नेम नसतो, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा देहुरोड शहरात आला आहे. देहुरोड शिवसेना (उबाठा गट) चे माजी अध्यक्ष भरत नायडू यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह अचानक ‘उबाठा’ला जय महाराष्ट्र करत शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला आहे. देहुरोडच्या वैश्य समाज मंदिर येथे मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नायडू यांनी ५० हून अधिक कट्टर कार्यकर्त्यांसह हातात ‘धनुष्यबाण’ घेतल्याने देहुरोडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

इसवी सनाच्या राजकारणात निष्ठा कधी बदलते हे सांगणे कठीण झाले असतानाच, देहुरोडमधील या हाय-व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख रामभाऊ सावंत, देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, शिवसेना देहूरोड शहरप्रमुख दीपक चौगुले, युवासेना मावळ तालुका अध्यक्ष विशाल लोखंडे आणि सागर लांगे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भरत नायडू यांच्या रूपाने देहुरोडमधील एक मोठा आणि सक्रिय चेहरा गळाला लागल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘उबाठा’ गटाला हा अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षप्रवेशाच्या या धडाकेबाज कार्यक्रमात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहूरोड शहरप्रमुख दीपक चौगुले यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. शहरात पक्षवाढीसाठी आणि शिवसेना तळागाळात पोहोचवण्यासाठी दीपक चौगुले हे सातत्याने अहोरात्र प्रयत्नशील असतात, अशा शब्दांत खासदारांनी चौगुलेंच्या संघटन कौशल्याचा जाहीर गौरव केला.

पक्षप्रवेशावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी भरत नायडू यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन पक्षात जंगी स्वागत केले. यापुढे पक्षाशी एकनिष्ठ राहून, सर्वांना सोबत घेऊन एकदिलाने काम करावे आणि पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी झटावे, अशा शुभेच्छा खासदारांनी यावेळी दिल्या. खासदार आणि उपस्थित नेत्यांच्या समोर आपली भूमिका मांडताना भरत नायडू यांनी, मी पक्षाशी संपूर्णपणे एकनिष्ठ राहीन आणि शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असेन, अशी ठाम ग्वाही दिली.

भरत नायडू यांच्या या अनपेक्षित आणि वादळी प्रवेशामुळे देहूरोड शहरात शिवसेना शिंदे गटाची बाजू प्रचंड मजबूत झाली आहे. आता उबाठा सोडलेल्या भरत नायडू यांना शिंदे गटात नेमके कुठले मानाचे पद मिळणार? याकडे संपूर्ण देहुरोडकरांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, या राजकीय पलटीनंतर भरत नायडू यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे.


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

44
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!