अमृत’ सर्वांसाठी की फक्त एकाच धर्मासाठी? ड्रोन प्रशिक्षण योजनेत मुस्लिम तरुणांना डिजिटल ‘नो एन्ट्री’!


३० जूनपूर्वी पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करा; फिरोज मुल्ला (सर) यांच्या शिष्टमंडळाचे ‘अमृत’चे संचालक विजय जोशी यांना निवेदन

पुण्यातील ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेने सध्या एक नवा चमत्कार करून दाखवला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) तरुण-तरुणींना आकाशात भरारी घेता यावी म्हणून संस्थेने ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षणाची योजना आणली खरी, पण या योजनेच्या डिजिटल प्रवेशद्वारातच एका विशिष्ट समाजासाठी ‘नो एन्ट्री’चा फलक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संविधानाने ज्यांना ‘आम्ही भारताचे लोक’ म्हटले, त्यांना अमृतच्या ऑनलाईन पोर्टलने मात्र ‘तुम्ही आमच्या फॉर्ममध्ये बसत नाही’ असे सांगून जमिनीवरच रोखून धरले आहे. या अजब कारभाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे प्रदेश मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी साहेब यांची भेट घेऊन त्यांना एक ‘कडू’ निवेदन सादर केले आणि या भेदभावाचा जाहीर निषेध केला.

सरकारी योजनांचे नियम हे सर्वांसाठी सारखेच असायला हवेत, पण अमृतच्या संगणक महाशयांना बहुदा संविधानापेक्षा स्वतःचेच वेगळे व्याकरण लिहायचे सुचले असावे. २२ ऑगस्ट २०१९ च्या मूळ सरकारी निर्णयात (GR) कोणत्याही धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा असा कोणताही संकुचित उल्लेख नाही. खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना न्याय देणे हा या संस्थेचा मुख्य हेतू. असे असताना, ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी जेव्हा मुस्लिम तरुण ऑनलाईन अर्ज करायला जातात, तेव्हा त्यांना जात-धर्माच्या चौकटीत अडकवून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.

डिजिटल भेदभाव की तांत्रिक अज्ञान?

फिरोज मुल्ला सरांनी निवेदनातून ‘अमृत’च्या या अजब पोर्टलचे वास्तव समोर आणले आहे. ३० जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, पण पोर्टलवर धर्म निवडताना केवळ ‘हिंदू’ हा एकच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात हिंदू नेपाळी, राजपूत, जाट अशा २३ जातींची यादी दिमाखात मिरवते आहे; पण महाराष्ट्रात राहणारा, कर भरणारा आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला मुस्लिम तरुण तिथे आपला धर्म शोधू लागला की पोर्टल थेट नकार देते! म्हणजे, विमाने आणि ड्रोन आकाशात उडणार, पण त्यात बसणारे उमेदवार मात्र ठराविकच धर्माचे असणार, असा जावईशोध या स्वायत्त संस्थेने लावलेला दिसतो.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात फिरोज मुल्ला सरांसोबत छत्रपती शिवाजी महाराज संघाचे अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाचा ‘ड्रोन’ कार्यालयावर घिरट्या घालणार.!

> “अमृताचा आस्वाद सर्वांना मिळावा, तो एकाच पंक्तीपुरता मर्यादित राहू नये,” अशी मागणी करत शिष्टमंडळाने प्रशासनाला धारेवर धरले.

३० जूनच्या आत पोर्टलमध्ये सुधारणा करून हिंदू / इतर धर्म’ असा पर्याय उपलब्ध करावा आणि मुस्लिम युवक-युवतींनाही अर्ज करण्याची समान संधी द्यावी, तसेच फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी न्याय्य मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने वेळीच डोळे उघडले तर ठीक; अन्यथा, या मागण्या मान्य न झाल्यास अमृतच्या पुणे कार्यालयासमोर संविधानाच्या मार्गाने ‘जनआंदोलन’ छेडले जाईल, असा कडक आणि जाहीर इशारा फिरोज मुल्ला सरांनी दिला आहे. आता चेंडू (आणि ड्रोनही) अमृत प्रशासनाच्या दरबारात आहे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!