प्रशासनाची ‘नियमावली’ आणि संविधानाची ‘ढाल’; टीईटी परीक्षेत हिजाबसाठी फिरोज मुल्लांचे शड्डू ..!


प्रशासनाची ‘नियमावली’ आणि संविधानाची ‘ढाल’; टीईटी परीक्षेत हिजाबसाठी फिरोज मुल्लांचे शड्डू ..!

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आगामी २८ जून २०२६ रोजी राज्यभरात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेने उमेदवारांना चेहरा, डोके किंवा मान झाकणारे कपडे जसे की दुपट्टा, बुरखा, टोपी, मफलर परिधान करण्यास मनाई केली आहे. मात्र, प्रशासनाच्या या नियमामुळे मुस्लिम महिला उमेदवारांच्या धार्मिक आणि घटनात्मक अधिकारांवर गदा येत असल्याचे समोर आले असून, याविरोधात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या संदर्भात पक्षाचे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर) यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राहुल वडमारे, चांदभाई बलबट्टी, सौ. आसमाताई शेख, रिपाई नेते अलोक भिंगारदिवे, किशोर वाघमारे, आकाश घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हिजाब आणि दुपट्टा हा मूलभूत अधिकार: फिरोज मुल्ला

शिक्षण आयुक्तांना दिलेल्या निवेदनात फिरोज मुल्ला यांनी मुस्लिम महिला उमेदवारांसाठी हिजाब आणि दुपट्टा हा त्यांच्या धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि वैयक्तिक ओळखीचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत हक्कांचा दाखला देत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

> “संविधानातील कलम १४ नुसार सर्वांना कायद्यापुढे समानता, कलम १९(१)(अ) नुसार अभिव्यक्ती व सांस्कृतिक ओळखीचे स्वातंत्र्य, कलम २१ नुसार प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आणि कलम २५ नुसार धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे बंदी घालणे महिला उमेदवारांच्या घटनात्मक अधिकारांवर प्रतिकूल परिणाम करणारे ठरेल,” असे मुल्ला यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सुवर्णमध्य काढण्याचा सुज्ञ तोडगा

परीक्षेची सुचिता, पारदर्शकता आणि सुरक्षितता राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, ही बाब शिष्टमंडळाने मान्य केली. त्यावर प्रशासकीय कोंडी फुटण्यासाठी एक सुज्ञ तोडगाही सुचवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी मुस्लिम महिला उमेदवारांची ओळख पडताळणी आणि सुरक्षा तपासणी स्वतंत्रपणे केवळ ‘महिला अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यांमार्फत’ करण्यात यावी. यामुळे परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हताही टिकून राहील आणि महिला उमेदवारांच्या धार्मिक भावना व घटनात्मक अधिकारांचा सन्मानही राखला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

आगामी २८ जूनच्या परीक्षेसाठी मुस्लिम महिला उमेदवारांना हिजाब व दुपट्टा परिधान करण्यास विशेष परवानगी देणारे आवश्यक आदेश मानवीय, संविधानिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्गमित करावेत, अशी आग्रही मागणी रिपाई (सचिन खरात गट) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आता या संवेदनशील मुद्द्यावर शिक्षण प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

 

#MahaTET2026 #MahaTET #HijabIssue #RightToEducation #ConstitutionOfIndia #FirozMulla #RPI #SachinKharatGat #PuneNews #EducationDepartment #WomenRights #MaharashtraNews #PressMediaLive


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!