पुण्यात गुरुजींचा पत्ता नाही आणि शाळा विकायला निघाल्यात; चंद्रकांतदादांना ‘आप’कडून थेट पंजाब वारीचं निमंत्रण !

– पुण्याचे हौसे-नवसे पाहुणे आणि सध्या कोथरूडकरांचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम चंद्रकांतदादा पाटील यांच्या गाठीशी तसे अनेक जागतिक दौरे आहेत, पण त्यांच्या कुंडलीत आता एका अनपेक्षित ‘पंजाब वारी’चा योग निर्माण झाला आहे! निमित्त ठरलंय, पुणे महानगरपालिकेच्या शाळांचे खाजगीकरण करण्याचा पालिकेचा ‘सुवर्ण’ विचार आणि त्याला दादांनी ‘सरकारी शाळा सुधारणे आपल्या आवक्याबाहेरचे आहे’ असे म्हणत दिलेले जोरदार, भावूक समर्थन! सरकारी शाळा चालवणे आणि त्या सुधारणे हे आपल्या कॉर्पोरेशनच्या आवाक्याबाहेरचे काम आहे, अशा वैराग्यपूर्ण भावनेतून दादांनी या खासगीकरणाची पाठराखण केली असावी. पण, ‘आम्ही असताना शाळांचा सौदा कसा काय होऊ देता?’ असा आव आणत ‘आम आदमी पार्टी’च्या (आप) कार्यकर्त्यांनी थेट दादांच्या कार्यालयावर धडक मारली—आंदोलन करून स्वतःचा घसा सुकवायला नाही, तर चक्कदादांना ‘फुकट’ विमान प्रवास घडवायला!
आपल्या पुणेरी संस्कृतीनुसार कोणाचेही स्वागत शाल, श्रीफळ किंवा किमान शनिवार पेठी टोमणा मारून केले जाते; पण ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी दादांना थेट ‘पंजाबचे प्रतीकात्मक विमान तिकीट’ आणि हातात ‘दिल्ली मॉडेल’ नावाचे पुस्तकच दिले ! “दादा, सरकारी शाळा सुधारत नाहीत हा तुमचा भ्रम आहे. जरा विमानाने पंजाबला फेरफटका मारून या, तिकडच्या शाळा डोळे भरून बघा आणि मगच पुण्यातल्या शाळांचा सुसाट बाजार मांडा,” असा अत्यंत प्रेमळ आणि जळजळीत चिमटा या कार्यकर्त्यांनी मारला. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सरकारी शाळांचा असा काही कायापालट केलाय की, खाजगी शाळावाले आता पोरांना शोधण्यासाठी गल्लीबोळात फिरतायत! पंजाबच्या शाळा तर ‘नीति आयोगा’च्या परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाल्यात. दादा, तुम्ही तिकडे जा, स्मार्ट क्लास बघा, शिक्षकांचं ट्रेनिंग बघा आणि मुख्य म्हणजे तिथला ‘हॅपिनेस करिक्युलम’ (आनंदी अभ्यासक्रम) स्वतः अनुभवून या, म्हणजे सरकारी शाळांच्या नावाने तुमच्याही चेहऱ्यावर थोडा तरी आनंद दिसेल, असा फुकटचा सल्ला ‘आप’च्या नेत्यांनी दादांना दिला.
आता पुण्याच्या शाळांची अवस्था काय, तर म्हणे शाळांमध्ये तब्बल ३२० शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत, आणि ४० टक्के शाळांना तर ‘मायबाप’ म्हणजेच मुख्याध्यापकच लाभलेले नाहीत! म्हणजे वर्गात गुरुजीच गायब आणि शाळा मात्र सुसाट चालल्यात! अशा बिकट परिस्थितीत ‘खासगीकरण’ हाच एकमेव जालीम, रामबाण उपाय आहे, असा शोध महापालिकेच्या सुपीक डोक्याच्या कारभाऱ्यांनी लावला होता. यावर जोरदार टोला लगावताना ‘आप’ने म्हटले की, शाळा चालवता येत नाही म्हणून तिचे खासगीकरण करणे, म्हणजेच भाजप सरकारने स्वतःच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची दिलेली जाहीर कबुली आहे! शाळा चालवायला खासगी कंपन्यांची दलाली लागत नाही, तर आर्थिक गुंतवणूक आणि राजकीय इच्छाशक्ती लागते, अशी रोखठोक भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
नेहमी ‘टोल’ आणि ‘तिकीट’ या विषयांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहणाऱ्या चंद्रकांतदादांना ‘आप’ने एक भन्नाट आणि खिसा गरम करणार ऑफर दिली आहे. “दादा, तुम्ही फक्त तारीख आणि वेळ सांगा. पंजाबच्या या विमान प्रवासाचा, राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा सजळा खर्च ‘आम आदमी पार्टी’ स्वतःच्या खिशातून करेल. एकदा पंजाबची हवा खाऊन आलात, की तुमची बुद्धी आणि भूमिका दोन्ही १०० टक्के बदलेल, अशी आम्हाला पक्की खात्री आहे,” असे निमंत्रण त्यांनी दिले. या ‘तिकीट वाटप’ सोहळ्याला डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे यांच्यासह ‘आप’च्या कार्यकर्त्यांची मोठी फौज हजर होती. आता चंद्रकांतदादा हे ‘फ्री’ विमान तिकीट स्वीकारून पंजाबला उड्डाण ठोकणार की पुण्यातल्या शाळांचा ‘प्रायव्हेट’ वर्ग भरवून पुणेकरांना घरचा रस्ता दाखवणार, याकडे संपूर्ण कोथरूडकरांचे डोळे लागून राहिले आहेत!



























