काय हे राजकारण..? काल एकमेकांचे वाभाडे काढले, आज ‘घड्याळा’च्या चिन्हासाठी पाय धरले !
पुणे | राजकारणात तत्त्व आणि निष्ठा आता केवळ शब्दकोशातच उरल्या आहेत की काय, असा प्रश्न पडावा असा ‘तमाशा’ सध्या जिल्ह्यात सुरू आहे. कालपर्यंत एकमेकांचे वाभाडे काढणारे, एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन्ही राष्ट्रवादीचे गट आता सत्तेच्या लोण्याकरता चक्क एकाच ‘घड्याळा’खाली एकत्र येण्यासाठी पाय धरू लागले आहेत. शिरूरच्या मैदानात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तर चक्क ‘मनोमिलनाचा’ शंखनादच करून टाकला आहे!
शिरूरमध्ये ‘कोल्हे’ कुई की गर्जना?
आंबेगावचा अपवाद वगळता अवघ्या जिल्ह्यात हे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे कोल्हे यांनी जाहीर केले. “आम्ही एकच, आमचे चिन्हही एकच” असा आव आणला जात असला, तरी ही एकी मनाची आहे की केवळ पराभवाच्या भीतीपोटी केलेली तडजोड, याची चर्चा आता चौकाचौकात रंगली आहे. उद्या दुपारपर्यंत या अभद्र युतीवर शिक्कामोर्तब होणार असून उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे.
निष्ठांचा लिलाव आणि पक्षांतराचा बाजार!
एकीकडे ‘घड्याळ’ नीट करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नाराजीचा ‘गजर’ जोरात वाजत आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी काल हातावर घड्याळ बांधले, तर राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केला! माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि अशोक पवार यांची समजूत काढताना नेत्यांच्या नाकी नऊ आले. ही कसली निवडणूक? हा तर निव्वळ आयाराम-गयारामांचा बाजार भरला आहे!
भाजप-शिंदेसेनेची छुपी ‘युती’!
राष्ट्रवादीच्या या सर्कशीला उत्तर देण्यासाठी भाजपनेही आता शिंदेसेनेशी संधान साधले आहे. जागांच्या वाटाघाटींसाठी गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू असून, सोमवारचा संपूर्ण दिवस राजीनामे आणि मनधरणी करण्यातच वाया गेला. जनतेच्या प्रश्नांचा कोणालाही सोयरसुतक उरलेले नाही, प्रत्येक जण फक्त आपल्या सोयीची ‘गाडी’ पकडण्यात मग्न आहे.
फटका : लाज-लज्जा गुंडाळून ठेवलेली ही मंडळी आता कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार? सत्तेसाठी ‘घड्याळा’चे काटे हवे तसे फिरवता येतीलही, पण जनतेच्या मनातील काळ सोयीनुसार बदलता येत नाही, हे या ‘संधीसाधू’ नेत्यांनी लक्षात ठेवावे!































