शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आमचे कारभारी म्हणतात, सगळा घोळ ‘स्पेलिंग’मध्ये आहे!

मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार :
त्या बिचाऱ्या शेक्सपिअरला काय माहीत की पुढे मागे महाराष्ट्रात असं एक ‘अक्षरशत्रू’ सरकार येईल जे माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या नावाच्या ‘स्पेलिंग’वर राज्य चालवेल! शेक्सपिअर ओरडून मेला की “नावात काय आहे?” (What’s in a name?), पण आमचं सरकार छाती ठोकून सांगतंय, “नावात काही नसलं तरी स्पेलिंगमध्ये आमचा पूर्ण बाजार आहे!”
आजच्या काळात सामान्य माणसाने जिवंत राहणे हाच मोठा चमत्कार मानला पाहिजे. अरे, ही लोकशाही आहे की ‘कटकट’शाही? सामान्य माणसाचं आयुष्य म्हणजे सध्या ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ असं झालं आहे.
चहु बाजूनी कटकटींचा वेढा..!
माणसाने जायचे कुठे? बाहेर निघावं तर सरकारची कटकट – कधी ‘आधार’ लिंक करा, कधी ‘केवायसी’च्या रांगेत उभे राहा. कसाबसा ऑफिसमध्ये पोहोचला तर तिथे बॉसची कटकट! आणि या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून संध्याकाळी थकून-भागून घरी यावं, तर तिथे बायकोची कटकट तयारच असते.
खिशात पैशाची आवक कमी झाली आणि महागाईमुळे घरात पैसे कमी पडू लागले की, बायकोचं जहाल उत्तर तयार असतं – “झेपत नव्हतं तर लग्न कशाला केलं?” माणसाचं वय झालं की त्याला साक्षात्कार होतो – लग्न करून मोठीच चूक केली! उतारवयात जे लग्नाचे ‘साइड इफेक्ट्स’ जाणवू लागतात, ते या रिकाम्या खिशामुळे अधिकच जीवघेणे वाटतात.
या सगळ्या सरकारी, ऑफिसच्या आणि घरच्या कटकटी सोसता सोसता डोक्याचे केस कधी निघून जातात, हे त्या बिचाऱ्या माणसाला कळतच नाही! आरशात पाहिल्यावर डोक्यावरच्या केसांऐवजी फक्त ‘निकालात निघालेलं टक्कल’ दिसतं. महागाईने खिसा रिकामा केला आणि कटकटींनी डोकं रिकामं (केसमुक्त) केलं! हीच काय ती आजच्या सामान्य माणसाची प्रगती!
महागाईचा फास आणि नशिबाचा घास!
“माझं नशीबच फुटलं आणि तुमच्याशी लग्न करून माझं पार वाटोळं झालं!” — हे जहाल वाक्य आज महाराष्ट्रातल्या घराघरातल्या भिंतींनाही पाठ झालं असेल! पण याला जबाबदार तो हतबल नवरा नसून, गगनाला भिडलेली ही अक्राळविक्राळ महागाई आहे. जेव्हा १००० रुपयांचा गॅस आणि ७२ रुपयांचं दूध माणसाचं कंबरडं मोडतं, तेव्हा घरात सुसंवाद नाही तर फक्त ‘कटकट’ उरते. सरकारचे नवे नियम आणि वाढत्या किमतींनी आज सामान्य माणसाच्या संसाराचा ‘होम’ केला आहे. नेत्यांचे खिसे गरम आणि जनतेचे नशीब मात्र ‘फुटके’ – हाच आजचा भीषण न्याय आहे!
नेत्यांना कशाचीच झळ नाही.!
गंमत पाहा, हे सगळे त्रास फक्त आमच्यासारख्या सामान्य जनतेलाच का? या राजकीय नेत्यांना कशाचीच फिकीर नसते. त्यांना ना ‘केवायसी’साठी रांगेत उभं राहावं लागतं, ना त्यांच्या नावाच्या स्पेलिंगची कुणी चूक काढतं. त्यांना ना वाढीव वीज बिलाचं टेन्शन, ना ७२ रुपये लिटर दुधाची काळजी! पाच-पाच गाड्यांचा ताफा आणि सरकारी बंगला असणाऱ्या या पुढाऱ्यांना गॅस सिलेंडर १००० रुपये झाला काय आणि भाजीपाला दुप्पट झाला काय, त्यांच्या खिशाला काहीच फरक पडत नाही.
नाव मराठी, पण गोंधळ इंग्रजी..!
त्यात ही तुमची ओळखपत्रे! आधारवर नाव ‘Mehabub’, पॅनवर ‘Mahaboob’ आणि वोटर कार्डवर तिसरंच काहीतरी! आता एका ‘u’ च्या जागी ‘oo’ झाला, की सरकारला वाटतं तुम्ही घुसखोर आहात. मग सुरू होतो तो नावाच्या दुरुस्तीचा खर्च, फॉर्म आणि मानसिक त्रास!
मराठीचा वापर सक्तीचा करा!
आमची स्पष्ट मागणी आहे की, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि वोटर कार्डवर नावासाठी इंग्रजीचा अट्टहास कशासाठी? ही सर्व कार्डं अस्सल मराठी भाषेतच असायला हवीत! मराठीत नाव लिहिलं की स्पेलिंगच्या चुकांचा प्रश्नच उरणार नाही. आपल्याच मातीत ‘मराठी’ वापरायला काय तुमची जीभ अडखळते का?
आधार’च्या नावाखाली सामान्य माणसाचा ‘उद्धार’ करण्याचं सोडून, हे सरकार स्पेलिंगच्या दुरुस्त्यांमध्ये मश्गूल आहे! * जनतेची व्यथा: लोकांच्या चुली पेटत नाहीत, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, पण सरकारला चिंता काय? तर म्हणे नावाचा काना-मात्रा चुकला!
‘लाडकी बहीण’ आणि ‘कडक’ महागाई
सरकार म्हणतं, “लाडकी बहीण योजना आणली!” बरं आहे बाबा. पण त्या बहिणीचा गॅस १००० रुपयांचा, दूध ७२ रुपये लिटर, आणि भाजीपाल्याचे भाव गगनाला! शिक्षण, आरोग्य आणि मुलांच्या ‘शीकवणी’चा खर्च म्हणजे पालकांच्या जखमेवर मीठच..!





























