सोलापूरच्या भूमीत घुमणार बहुजन कर्तृत्वाचा हुंकार; क्रांतीसूर्याच्या २०० व्या जयंतीचा ऐतिहासिक सोहळा !
सोलापूर: क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीचा डंका आज साऱ्या महाराष्ट्रात वाजत असतानाच, सोलापूरच्या भूमीत संघर्षाचा एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे! संविधानाचे रक्षणकर्ते आणि बहुजनांच्या हक्कासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आवाज उठवणारे प्रख्यात कायदेतज्ज्ञ ॲड. डॉ. सुरेश माने यांना यंदाचा ‘संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला असून, हा सोहळा म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ईर्ष्येचाच विजय आहे!

‘संघर्षनायक मीडिया’ या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मने आपल्या ८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा जो ‘विद्वत्तेचा महाकुंभ’ भरवला आहे, त्याला तोड नाही. डॉ. सुरेश माने! हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो संविधानाचा रक्षक. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात कायद्याचे धडे गिरवणारा हा ‘मास्तर’ जेव्हा अन्यायाविरुद्ध मैदानात उतरला, तेव्हा त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने प्रस्थापितांना घाम फोडला. पदोन्नतीतील आरक्षणाची लढाई असो वा बहुजन समाजाची राजकीय वज्रमूठ बांधणे असो, माने यांनी कधीच आपली तलवार म्यान केली नाही. अशा या धगधगत्या विचारांच्या माणसाला ‘संघर्षनायक’ पुरस्कार मिळणे, म्हणजे हा पुरस्कारच स्वत:ला धन्य मानून घेत आहे!

कर्तृत्वाचा जागर आणि दिग्गजांची मांदियाळी!
या सोहळ्यात केवळ मानेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या मातीतील अनेक हिरे लकाकणार आहेत. राज्यसभेत बहुजनांचा आवाज बुलंद करणाऱ्या प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे, पत्रकारितेचा बाणा जपणारे महादेव नरुटे, शेतीमातीशी नाळ जोडलेले रामाप्पा चिवडशेट्टी, ग्रामीण विकासाचे शिलेदार सुनील भाऊ बनसोडे आणि तरुण तडफदार नेतृत्व उमेश दादा पाटील… अशा दिग्गजांचा सन्मान करून संघर्षाला सलाम ठोकला जाणार आहे.
सोलापूरच्या भूमीत ऐतिहासिक सोहळा!
येत्या ११ एप्रिल २०२६ रोजी, सकाळी ठीक ११ वाजता, सोलापूरचे डॉ. निर्मलकुमार फडणकुले सभागृह या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार मा. सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या सोहळ्याचे दीपप्रज्वलन होईल. यावेळी दिलीप माने (मालक), दीपक वैद्य, इंद्रजीत पवार, संतोष आठवले, डॉ. वालिया, उमेश जामसंडेकर यांसारख्या महारथींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
सोलापूरकरांनो, हा केवळ कार्यक्रम नाही, हा विचारांचा रणसंग्राम आहे! संविधानाच्या रक्षकाचा सन्मान करण्यासाठी आणि क्रांतीसूर्याच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा.
सोहळ्याचा तपशील विसरू नका:
दिनांक: ११ एप्रिल २०२६ (शनिवार)
वेळ: सकाळी ११:०० वाजता
स्थळ: डॉ. निर्मलकुमार फडणकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर.



























