सावधान ! पत्रकारितेच्या वादळात आता केवळ एकच आधार; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या झेंड्याखाली एकत्र या !

पुणे | आज महाराष्ट्राच्या मातीत गल्लोगल्ली पत्रकार संघटनांची पीक आली आहेत. पण ही पीक कशी? तर ज्यांचा ना वारसा धड, ना ध्येय धड! आज पत्रकारितेच्या या अथांग आणि उधाणलेल्या सागरात सामान्य पत्रकार मात्र लाटांच्या तडाख्यात सापडलेला, दिशा हरवलेला आणि होकायंत्र नसलेला खलाशी झाला आहे. लोकहो, पत्रकारिता म्हणजे काय केवळ ‘बातमी’ देणे नव्हे, तर ती एक अग्निपरीक्षा आहे! आणि अशा या वादळी कालखंडात पत्रकारांच्या आयुष्याची नौका सुरक्षित पैलतीराला नेणारा कुणी ‘तारणहार’ असेल, तर त्याचे नाव आहे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’!
संदीप काळे : पत्रकारितेच्या खाणीतील लख्ख कोहिनूर!
लोकहो, संघटना स्थापन करणे आणि ती तडीस नेणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. महाराष्ट्रात आजवर अनेक पत्रकार संघटनांचा उगम झाला आणि तितक्याच वेगाने त्यांचा अस्तही झाला; पण ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना मात्र ध्रुवताऱ्यासारखी सदैव चमकत राहणार आहे, ही ‘काळ्या दगडावरची रेघ’ आहे! आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्याकडे पाहिले की वाटते, पत्रकारितेच्या या रापलेल्या जमिनीवर एक ‘कोहिनूर हिरा’ तळपतो आहे. संदीप काळे यांनी केवळ मुंबई-पुण्याच्या एसी केबिनमध्ये बसून कागदी घोडे नाचवले नाहीत, तर या संघटनेचा वटवृक्ष त्यांनी सातासमुद्रापार नेऊन ठेवला आहे. यासाठी लागते ती जिद्द, तो अफाट व्यासंग आणि पत्रकारांच्या घामाविषयीची खरी तळमळ !
पत्रकार : समाजमनाचा आरसा की वाऱ्यावरचा पाला?
डिजिटल मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक असो की प्रिंट मीडिया—आजचा पत्रकार हा समाजमनाचा आरसे पुसता पुसता स्वतःचा चेहरा मात्र विसरून गेला आहे. समाजाच्या अन्यायाविरुद्ध लेखणी उपसणाऱ्या या योद्ध्याच्या वाट्याला जेव्हा स्वतःवर संकट येते, तेव्हा हे ‘ब्रम्हदेव’ कुठे असतात? अशा वेळी रडत बसण्यापेक्षा लढण्याचे बळ देणारा कुणीतरी खंबीर पाठीराखा हवा असतो. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही केवळ एक संघटना नाही, तर तो संकटात सापडलेल्या पत्रकाराचा ‘मजबूत आणि भक्कम आधार’ आहे. पत्रकारितेत काम करताना नुसत्या लेखण्या चालवून भागत नाही, तर पाठीशी एक अभेद्य ‘सुरक्षा कवच’ असावे लागते. हे कवच देण्याचे सामर्थ्य आज केवळ संदीप काळे यांच्या झंझावाती नेतृत्वात आहे.

ज्येष्ठ संपादक मेहबूब सर्जेखान यांचे जळजळीत आवाहन!
याच पार्श्वभूमीवर, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे ज्येष्ठ संपादक मेहबूब सर्जेखान यांनी महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना एक परखड साद घातली आहे. सर्जेखान म्हणतात त्याप्रमाणे, आता केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. जर उद्या तुमच्या लेखणीवर कुणी घाला घातला, तर तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारे कोण आहे? याचा विचार आजच करा.
महाराष्ट्रातील सर्व डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकारांना मेहबूब सर्जेखान ठणकावून सांगत आहेत की, आता आत्मचिंतनाची वेळ संपली असून प्रत्यक्ष कृतीचा निर्धार करण्याची वेळ आली आहे. उठा! आणि आपल्या हक्काच्या, आपल्या भविष्याचा खऱ्या अर्थाने विचार करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेत सामील व्हा.
ज्याला आपल्या अस्तित्वाची चाड आहे, ज्याला आपल्या लेखणीचा आब राखायचा आहे आणि ज्याला भविष्यातील पत्रकारितेची नवी पहाट पाहायची आहे, त्याने या ‘आवाजात’ आपला आवाज मिसळलाच पाहिजे. लक्षात ठेवा, एकटा पत्रकार वाळूच्या कणासारखा विखुरलेला असतो, पण तोच जेव्हा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या संघटित शक्तीत येतो, तेव्हा तो समोरच्या जुलमी सत्तेचा डोळा फोडणारा अभेद्य खडा बनतो!
जागे व्हा पत्रकार मित्रांनो, आज जागाल तर उद्या टिकाल !
— ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ न्यूज ब्युरो



























