धन्य ती बँक आणि धन्य ते अनास्कर! निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसणारा ‘सहकारी’ झरा !


धन्य ती बँक आणि धन्य ते अनास्कर! निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसणारा ‘सहकारी’ झरा..!

मुंबई : सहकारात राजकारण भरपूर चालते, कुरघोडीचे हिशोबही मांडले जातात, पण माणसाच्या म्हातारपणाची व्यथा समजून घेणारे मायबाप फार कमी असतात! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मात्र आज आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसून सहकाराचा ‘महाराष्ट्र धर्म’ काय असतो, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर बँकेच्या तिजोऱ्या सांभाळल्या, त्याच हातांना जेव्हा म्हातारपणात आजारपणाने ग्रासले, तेव्हा हीच बँक ‘कामधेनू’ सारखी धावून आली आहे. विद्याधर अनास्कर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने ‘माजी कर्मचारी आरोग्य साहाय्य योजना’ जाहीर करून एक प्रकारे कृतज्ञतेचीच पावती दिली आहे.

यमदूतांशी दोन हात करण्याची ताकद..!

कॅन्सर, किडनी निकामी होणे, अर्धांगवायू किंवा पार्किन्सनसारखे दुर्धर आजार म्हणजे सामान्य माणसासाठी ‘यमदूतच’! निवृत्तीनंतर हाताशी तुटपुंजी पुंजी असताना या आजारांचा खर्च पेलणे म्हणजे सुळावरची कसरत असते. पण आता काळजी नको! अशा संकटात सापडलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याला दरमहा ५,००० रुपयांची मदत देऊन बँकेने त्यांच्या औषधपाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ही पाच हजारांची नोट नसून “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” हे सांगणारे प्रेमाचे पत्र आहे!

बँकिंग नव्हे, ही तर माणुसकी..!

शस्त्रक्रियेसाठी मदत तर आधीच मिळत होती, पण आता मासिक मदतीचा हात देऊन अनास्करांनी प्रशासकीय मंडळात केवळ डोकं नाही, तर काळजाचाही वापर केला आहे, हे सिद्ध होते. ‘कर्मचारी कल्याण निधी’चा असा सत्कार्य विनियोग पाहून कुणालाही हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही.

बँकेच्या सेवानिवृत्त शिलेदारांनी आता चिंता सोडून मुंबईच्या मुख्य कार्यालयात किंवा प्रादेशिक कार्यालयांत आपला हक्क मागावा. सहकाराच्या बाजारात माणुसकीचा हा ‘शेअर’ सध्या वधारला असून, इतर बँकांनीही यातून काहीतरी बोध घ्यावा, इतकंच!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!