अंधाराच्या ‘अजगरा’ला शिरढोणच्या ‘नागोबा’चा दणका; टेबलावर साप पाहताच प्रशासनाची ‘लाईट’ लागली !


अंधाराच्या ‘अजगरा’ला शिरढोणच्या ‘नागोबा’चा दणका; टेबलावर साप पाहताच प्रशासनाची ‘लाईट’ लागली..!

 

 (शिरढोण हैदर अली मुजावर ) :

महाराष्ट्रात सध्या ‘अच्छे दिन’ आले की नाहीत, हे देव जाणे; पण ‘अंधेरे दिन’ मात्र मुक्कामाला आले आहेत, याची प्रचिती शिरढोणच्या ‘पाणदारे मळी’त आली आहे! महावितरणच्या गलथान कारभाराचा उजेड इतका पडला आहे की, बिचाऱ्या नागरिकांना आपल्या हक्काच्या प्रकाशासाठी चक्क सापाचा आधार घ्यावा लागला. ज्या कार्यालयाला फोनवर माणसाचा आवाज ऐकू येत नाही, तिथे एका सरपटणाऱ्या प्राण्याने महावितरणची ‘लाईन’ क्लिअर केली!

झोपाळू प्रशासन आणि अंधाराचा खेळ

नदीकाठी वस्ती, उन्हाळ्याचा कडाका आणि त्यात मध्यरात्री वीज गायब! शिरढोणच्या त्या ४० घरांनी काय पाप केलं होतं? महावितरणचे कर्मचारी नाईट शिफ्टला असतात की ‘प्राणायाम’ करत झोपलेले असतात, हाच मोठा प्रश्न आहे. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न देणे ही यांची जुनी खोड. पण म्हणतात ना, “अति तिथे माती!” लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि अंधारात घरात आलेल्या सापालाच त्यांनी निमंत्रण दिले.

कार्यालयात ‘साक्षात’ नागोबा..!

एका बाजूला अंधार आणि दुसऱ्या बाजूला समोर फुत्कारणारा साप! पण शिरढोणकर डगमगले नाहीत. जो साप डसतो तो परवडला, पण जो महावितरण नावाचा अजगर सामान्य माणसाचे जगणे गिळंकृत करत आहे, त्याला धडा शिकवणे भाग होते. तो साप अलगद पकडून संतापलेले नागरिक थेट कार्यालयात शिरले. साहेबांच्या रिकाम्या टेबलावर तो साप विराजमान झाला आणि काय आश्चर्य! जो वीजपुरवठा तासनतास गायब होता, तो त्या ‘नागोबा’च्या दर्शनाने काही मिनिटांतच खळाळून प्रवाहित झाला!

कोपरखळी :

“महावितरणच्या साहेबांना माणसाची तक्रार कळत नाही, पण सापाची भाषा मात्र तत्काळ समजते! जोपर्यंत टेबलावर विषारी साप येत नाही, तोपर्यंत आमच्या प्रशासनाची ‘ट्युबलाईट’ पेटत नाही, हे दुर्दैव आहे.”

आता तरी डोळे उघडणार का?

शिरढोणच्या या घटनेने लोकशाहीतील एका नव्या निषेध पद्धतीचा जन्म झाला आहे. तक्रार निवारण केंद्रात आता ‘उंदीर-घुशी’ नेण्यापेक्षा ‘नाग’ नेणे जास्त परिणामकारक ठरते आहे, हे सिद्ध झाले. पण प्रश्न हा आहे की, महावितरणला जाग येण्यासाठी दरवेळी एखादा सापच अंगावर सोडावा लागणार का? प्रशासनाने या घटनेचा धसका घेऊन शिरढोणकरांना अखंडित वीज द्यावी, अन्यथा पुढच्या वेळी नागरिक कोणता प्राणी घेऊन येतील, याचा नेम नाही!

प्रशासनाचा कारभार म्हणजे, “दिवा खाली अंधार” नव्हे, तर “कार्यालयाखाली साप” झाला आहे!


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!