धम्म सदन देहुरोड येथे ‘माता रमाई विद्यार्थी निवास संकुला’चा चौथा वर्धापन दिन उत्साहात; संस्थापक अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी यांचा ७० वा वाढदिवस संपन्न


धम्म सदन देहुरोड येथे ‘माता रमाई विद्यार्थी निवास संकुला’चा चौथा वर्धापन दिन उत्साहात; संस्थापक अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी यांचा ७० वा वाढदिवस संपन्न

देहूरोड (प्रतिनिधी):

शितळानगर, देहूरोड येथील ‘धम्म सदन’ परिसरात लोकवर्गणीतून आकाराला येत असलेल्या माता रमाई विद्यार्थी निवास संकुलाचा ४ था वर्धापन दिन आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी यांचा ७० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून संकुलाच्या कार्याचे कौतुक केले व सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या सत्काराला उत्तर देताना के. एच. सूर्यवंशी भावूक झाले. ते म्हणाले की, या वास्तूचे खरे शिल्पकार मी नसून समाजातील दानशूर देणगीदार आहेत. अनाथ, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आणि शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने सुरू झालेला हा प्रकल्प आज ४ वर्षे पूर्ण करत आहे. समाजाच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न सत्यात उतरत आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नगरसेवक निलेश तरस यांनी सूर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव केला. सूर्यवंशी साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म विचारांचे अनुकरण करून समाजासाठी मोलाचे कार्य करत आहेत. माता रमाई विद्यार्थी संकुल लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही माझीही इच्छा आहे आणि त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते व संविधान सन्मान संघाचे मार्गदर्शक श्रीमंत शिवशरण यांनी उपस्थितांना मदतीचे आवाहन केले. ते म्हणाले की, या संकुलातून भविष्यात आयपीएस, आयएएस आणि एमपीएससीचे अधिकारी घडावेत, हा सूर्यवंशी यांचा उदात्त हेतू आहे. समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने या कार्यात धम्मदान करावे.

कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक सुत्तपठणाने झाली. प्रसिद्ध गायक मोहन शिंदे यांनी सूर्यवंशी यांच्या कार्यावर आधारित सुमधुर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष दादासाहेब रणपिसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

यावेळी मान्यवरांनी संकुलाच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत केली. ए. व्ही. सवाखंडे यांनी ५१ हजार रुपयांची देणगी सूर्यवंशी यांच्याकडे सुपुर्द केली. तसेच बाबु हिरमेठकर, श्रीमंत शिवशरण आणि इतर कार्यकर्त्यांनीही आर्थिक मदत देऊन संस्थेच्या विश्वास्तांचे कौतुक केले.

या सोहळ्याला रघुवीर शेलार, बाळासाहेब कडाळे, प्रकाश कांबळे, उत्तम हिंगे, सारिका नाईकनवरे, पुष्पा कांबळे, आशा गायकवाड, अशोक कांबळे, चंद्रशेखर पात्रे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे रुईकर यांनी केले, तर अमोल नाईकनवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील वाव्हळे, प्रवीण कांबळे, रोहन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!