रावेत येथील ‘एजे फर्निचर मॉल’वर भररस्त्यात गोळीबार; बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ!


शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ‘हा फक्त ट्रेलर’ म्हणत शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोईच्या नावाने सोशल मीडियावर धमक्या, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण.

पिंपरी-चिंचवड: चंद्रशेखर पात्रे :

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. काल (शुक्रवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास रावेत येथील प्रसिद्ध आणि उच्चभ्रू परिसरातील ‘एजे फर्निचर मॉल’वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, उद्योग आणि व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

५ ते ६ राऊंड फायर, मॉलचे मोठे नुकसान :

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास एका दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर मॉलसमोर आले. त्यांच्या हातात दोन पिस्तुलं होती. त्यांनी मॉलच्या दिशेने थेट पाच ते सहा राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात गोळ्या मॉलच्या नेमप्लेट आणि दर्शनी भागातील काचेवर लागल्याने मॉलचे मोठे नुकसान झाले आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी काही क्षणांतच दुचाकीवरून पसार झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ आणि गोंधळ उडाला.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध? सोशल मीडिया पोस्टने खळबळ:

या घटनेला अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे, कारण कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल,” अशी थेट धमकी देण्यात आली आहे.

त्यासोबतच, या घटनेनंतर एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यामध्ये स्वतःला लॉरेन्स बिश्नोई का भाऊ आरजू बिश्नोई सांगणाऱ्या व्यक्तीने, “जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आमच्या सोबत लवकरच भेट होईल,” असा धमकीवजा इशारा दिला आहे. पोलिस सध्या या सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत.

पोलिस यंत्रणा सतर्क ; सीसीटीव्ही फुटेज ताब्यात:

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त गणेश इंगवले यांनी सांगितले की, घटनास्थळावरून महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.

‘महाराष्ट्र की बिहार?’ नागरिकांमध्ये चर्चा:

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढणारे खून, गोळीबार, गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत यामुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यातच आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर कनेक्शन असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने, “हा महाराष्ट्र आहे की बिहार?” अशी संतप्त चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. व्यापाऱ्यांना लक्ष्य करून खंडणी किंवा दबावाचे तंत्र वापरले जात असल्याने पोलिस प्रशासनावरील दबाव प्रचंड वाढला आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!