वाढदिवसाचा पैसा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी द्या; श्रीमंत शिवशरण यांचे आवाहन


देहूरोड येथे सामूहिक अभिष्टचिंतन सोहळ्यात मान्यवरांचा स्तुत्य उपक्रम; अनावश्यक खर्च टाळून ‘माता रमाई विद्यार्थी संकुला’ला धम्मदान करण्याचा उपस्थितांचा निश्चय

देहूरोड (प्रतिनिधी), २ जून:

समाजातील अनाथ, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत निवास, भोजन व शिक्षणाची सोय व्हावी यासाठी देहूरोड येथील शितळानगर परिसरातील धम्मसदन येथे ‘त्यागमूर्ती माता रमाई विद्यार्थी निवास संकुल’ उभारण्यात येत आहे. या संकुलाच्या उभारणीस वायफळ खर्च न करता सर्वांनी सढळ हाताने मदत करून हातभार लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक नेते तथा आरपीआय (पिंपरी-चिंचवड) चे अध्यक्ष श्रीमंत शिवशरण यांनी केले.

१ जून रोजी विविध सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था आणि भारतीय बौद्ध महासभा (देहूरोड शाखा) यांच्या वतीने धम्मसदन येथे एका विशेष अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी व मान्यवरांनी यापुढे वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता तो पैसा माता रमाई विद्यार्थी संकुलाला दान देण्याचा महत्त्वपूर्ण निश्चय केला.

विकास आराखड्याचा पहिला टप्पा पूर्ण

कार्यक्रमात बोलताना श्रीमंत शिवशरण व बाळासाहेब धावारे म्हणाले की, लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून अंदाजे १ कोटी रुपये खर्चाच्या या विकास आराखड्याचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. उर्वरित कामही येत्या काही महिन्यांत पूर्ण केले जाईल. समाजोपयोगी आणि विधायक प्रकल्पांसाठी समाजाने वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च टाळून तो पैसा गरिबांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणावा.

मान्यवरांचा ग्रंथ व शॉल देऊन सत्कार…

भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रकाश चां. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. धम्मसदन व रमाई विद्यार्थी संकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ताराबाई भालेराव, पुष्पा सोनवणे, प्रकाश कांबळे (रुईकर), श्रीमंत शिवशरण, सुरेश दगडू भालेराव, अशोक शिवशरण आणि लक्ष्मीकांत कुंबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ, पंचशील, शॉल आणि ‘भारतीय संविधान’ ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.

तरूणांनी फालतू खर्च टाळावा: चंद्रशेखर पात्रे

यावेळी शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पात्रे यांनी तरुण पिढीवर तीव्र शब्दांत बोट ठेवले. ते म्हणाले की, आज समाजात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळाच छंद निर्माण झाला आहे. तरुण पिढी वाढदिवसाच्या नावाखाली दारू, फटाक्यांची आतिषबाजी यांवर हजारो रुपयांची उधळपट्टी करत आहे. अशा फालतू खर्चापेक्षा तो पैसा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावा. धम्मदान आणि अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

वाढदिवसाच्या दिवशीच आर्थिक मदत सुपूर्द

निवासी संकुलाच्या बांधकामास हातभार लावत वाढदिवस साजरा करणारे मान्यवर सुरेश भालेराव, लक्ष्मीकांत कुंबळे, अशोक शिवशरण, प्रकाश कांबळे (रुईकर), श्रीमंत शिवशरण, ताराबाई भालेराव आणि प्रिती कांबळे यांनी प्रत्यक्ष आर्थिक दान देऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

उपस्थितांची मोठी गर्दी…..

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना, सुत्तपठण आणि मोहन शिंदे यांच्या सुमधूर भीमगीताने झाली. विठ्ठल गायकवाड, अंभोरे, प्रमिला चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी आशा गायकवाड, संजिवनी चव्हाण, छाया शिंदे, हिराबाई राक्षे, रेश्मा कांबळे, शिल्पा शेंडे, प्रिती कांबळे, तुळसाबाई गायकवाड, सोनाई मराठे, सुमित्रा अष्टगे, प्रतिभा खंडारे, उषा वाव्हळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, मधुकर रोकडे, परशुराम दोडमणी, सुनील कांबळे, महेंद्र सरोदे, प्रविण साखरे, अनुकूल गायकवाड यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर धम्मसदनच्या वतीने सर्व उपस्थितांना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद दिला.

#DehurodNews #MataRamaiSankul #ShrimantShivsharan #DhammaDan #SocialMessage #BirthdayCelebration #EducationForPoor #PressMediaLive #PuneNews #SocialAwareness


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!