एपस्टीन’च्या फाईलला ‘महाराष्ट्रा’चा टॅग नको; ‘आप’च्या युवा आघाडीचा चित्रपट निर्मात्यांना इशारा


एपस्टीन’च्या फाईलला ‘महाराष्ट्रा’चा टॅग नको; ‘आप’च्या युवा आघाडीचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

पुणे :परदेशातील कुप्रसिद्ध ‘एपस्टीन फाईल्स’चे वारे आता मराठी चित्रपटसृष्टीच्या दारात येऊन थबकले खरे, पण चित्रपटाच्या शीर्षकात ‘महाराष्ट्र’ हे नाव घुसडल्याने आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचा पारा चांगलाच चढला आहे. आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द तातडीने गाळावा, अशी आक्रमक मागणी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.

आपली ही भूमिका मांडण्यासाठी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चित्रपट महामंडळाला ईमेल धाडत जोरदार निषेध नोंदवला आहे. या पत्रात त्यांनी निर्मात्यांच्या या नामकरणावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राज्यातील जनतेच्या वतीने आक्षेप घेताना काळे यांनी म्हटले आहे की, “समाजात जनजागृती करण्यासाठी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चित्रपट बनत असेल, तर आम आदमी पार्टी त्याचे नक्कीच स्वागत करेल. मात्र, एका लैंगिक शोषणाच्या आणि विकृत प्रकरणाच्या नावामागे थेट ‘महाराष्ट्र’ हा शब्द जोडणे, हा कोट्यवधी मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा घोर अपमान आहे.”

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या या भूमीची अस्मिता अशा ‘भोंदू विकृती’मुळे दुखावली जात असल्याची भावना काळे यांनी व्यक्त केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला आहे.

सध्या तरी ईमेलच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असले, तरी चित्रपट महामंडळ आणि सरकारने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन नावातून ‘महाराष्ट्र’ शब्द वगळण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास, ‘आप’ची युवा आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही रविराज काळे यांनी दिला आहे. आता निर्माते ‘महाराष्ट्र’ हे नाव बाजूला सारून फाईल बंद करतात की आंदोलनाचा नवा अंक सुरू होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!