प्रेस मीडिया लाईव्ह’चा आसूड ! अभिनेते महमद रफीक मांगुरे सरांच्या साथीने, नशेचा विळखा तोडणार..!


प्रेस मीडिया लाईव्ह’चा आसूड ! अभिनेते महमद रफीक मांगुरे सरांच्या साथीने, नशेचा विळखा तोडणार..!

पुणे: “अहो, या महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांचे रक्त सळसळते की नशेची घाण वाहते?” असा जळजळीत सवाल विचारण्याची वेळ आज या दळभद्री परिस्थितीने आणली आहे. गल्लोगल्ली फुटलेली दारूची दुकाने आणि कोपऱ्याकोपऱ्यावर ‘धूर’ सोडणारी तरुण पिढी पाहिली की, अंगाचा थरकाप उडतो. पण आता शांत बसून चालणार नाही! या नशेच्या राक्षसाला  बाहेर गाढण्यासाठी **’प्रेस मीडिया लाईव्ह’**ने कंबर कसली आहे.

होय, नशा मुक्तीच्या विषयावर एका महाभयंकर वास्तवाचा बुरखा फाडण्यासाठी एका ‘शॉर्ट फिल्म’ची घोषणा आज करण्यात आली आहे. आणि या रणधुमाळीत आपल्या सोबतीला कोण आहे? तर मराठी चित्रपटसृष्टीचे कसलेले आणि भारदस्त व्यक्तिमत्व अभिनेते महमद रफीक मांगुरे सर !

नशा की विनाशाची नशा ?

आजचा तरुण वाचनालयात जाण्याऐवजी वाईन शॉपच्या रांगेत उभा असलेला दिसतो, तेव्हा काळजात चर्रर होतं. हातामध्ये लेखणी असायला हवी तिथे आज अंमली पदार्थांच्या सुया टोचल्या जात आहेत. अरे, हे काय चाललंय? हा महाराष्ट्र आहे की व्यसनाधीनतेचे कुरण? ज्या हातांनी उद्याचा भारत घडवायचा, तेच हात आज थरथरत आहेत. या विनाशाच्या नशेला आता लगाम घालावाच लागेल!

अभिनेते महमद रफीक मांगुरे  सर :

अभिनयाचा रणसंग्राम! या लघुपटात मांगुरे सरांसारखा हिरा लाभणे, ही या मोहिमेची पहिली फत्ते आहे. त्यांच्या आवाजातील जरब आणि अभिनयातील धार जेव्हा पडद्यावर येईल, तेव्हा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. ही केवळ एक फिल्म नाही, तर हा एक ‘हल्ला’ आहे – त्या प्रवृत्तीवर जी आपल्या घराघरात काळोख पसरवू पाहत आहे.

प्रेस मीडिया लाईव्हचा निर्धार..! 

आम्ही पत्रकार आहोत, अन्यायावर आसूड ओढणे हेच आमचे काम. पण आता केवळ लेखणी चालवून भागणार नाही, तर पडद्यावर वास्तव मांडून या समाजाचे डोळे उघडावे लागतील. म्हणूनच, ‘नशा मुक्त’ समाजासाठी हे पाऊल उचलले आहे.

साधुसंतांच्या या भूमीला नशेच्या चिखलात रुतू देणार नाही, हाच आमचा आजचा विडा आहे. ज्यांना हे झोंबतेय त्यांनी खुशाल झोंबून घ्यावे, पण आम्ही ही ‘शॉर्ट फिल्म’ नव्हे, तर ‘समाजक्रांती’ घडवणारच!

बघा, वाचा आणि विचार करा! कारण उद्याचा सूर्य निर्व्यसनी उगवलाच पाहिजे!

मेहमूब सर्जेखान मुख्य  संपादक, प्रेस मीडिया लाईव्ह.

 

 

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!