भोसरीच्या ‘महेशा’चा तांडव की द्वेषाचा वणवा? लोकप्रतिनिधीच्या जिभेला हाड की सत्तेचा माज?


भोसरीच्या ‘महेशा’चा तांडव की द्वेषाचा वणवा? लोकप्रतिनिधीच्या जिभेला हाड की सत्तेचा माज?

पिंपरी चिंचवड : युनुस खतीब:

ज्या पिंपरी-चिंचवडच्या मातीने कष्टाचा घाम आणि विकासाचा प्रकाश पाहिला, त्याच मातीत आज द्वेषाचे विष पेरण्याचे कारस्थान सुरू झाले आहे की काय, असा थरकाप उडवणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अहिल्यानगरच्या सभेत जे काही ‘मुक्ताफळे’ उधळली आहेत, ती ऐकून कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जावी! पण सत्तेच्या उबेत बसलेल्या या लोकप्रतिनिधीच्या जिभेला जणू हाडच उरलेले नाही, असे त्यांच्या विखारी विधानांवरून स्पष्ट होत आहे.

द्वेषाची पेरणी आणि सत्तेचा धिंगाणा!

अहो आमदार महोदय, तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात की एखाद्या विशिष्ट विचारधारेचे भाडोत्री प्रवक्ते? हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्यावर घाला घालून, जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून तुम्ही कसला ‘तांडव’ करू पाहत आहात? ही लोकशाही आहे की तुमची खाजगी कुस्तीची आखाडी? अहिल्यानगरमध्ये तुम्ही जे गरळ ओकले, त्याचा धूर आता पिंपरी-चिंचवडच्या शांततेला गालबोट लावू पाहत आहे. हा द्वेषाचा वणवा पेटवून तुम्हाला नेमकी कोणती राजकीय पोळी भाजायची आहे?

खाकी वर्दीचा कणा नेमका कुठे गेला?

सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’च्या विरोधात पोलिसांना ‘सुओ मोटो’ (स्वतःहून) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पण पिंपरी-चिंचवडचे पोलीस बहुधा कुंभकर्णाच्या झोपेत असावेत! तक्रारदार युनूस खतीब यांनी व्हिडिओ, पुरावे आणि शब्दांची जंत्री पोलिसांसमोर मांडूनही अजून ‘एफआयआर’चा पत्ता नाही. लोकप्रतिनिधीवर कारवाई करताना पोलिसांचे हात थरथरतात की सत्तेचा अदृश्य वरदहस्त त्यांच्या लेखणीला रोखतो आहे?

जनतेचा संतप्त सवाल!

आमदार लांडगे यांचे हे भाषण म्हणजे निव्वळ राजकारण नसून, तो समाजाच्या काळजात खुपसलेला खंजीर आहे. पिंपरी-चिंचवडची जनता आता विचारते आहे – “हेच का तुमचे विकासाचे व्हिजन?” केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण करणे, हा लोकशाहीचा खून नाही का?

आता कायद्याचा चाबूक लांडगेंच्या पाठीवर बसणार की नेहमीप्रमाणे ही फाईलही सत्तेच्या दबावाखाली बासनात गुंडाळली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण एक लक्षात ठेवा, द्वेषाचा हा वणवा उद्या तुमच्याच घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!