फरार आरोपी नाव बदलून केटरर्स चे काम करीत होता नेरळ पोलिसांनी 24 वर्षानंतर घेतले ताब्यात
प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
कुऱ्हाडीचे घाव करून नऊ महिन्यांच्या गर्भवती सख्या भावजयचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी दिरास तब्बल 24 वर्षांनंतर नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी संतोष गणपत राणे हा गेली अनेक वर्षे नाव बदलून ‘संतोष गणपत पाटील’ या नावाने पिंपरी चिंचवड परिसरात केटरर्सचे काम करीत होता. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या तपास पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त सुत्रे आणि प्रचंड चिकाटीच्या बळावर केलेल्या या तपासाने पोलिसांची मोठी कामगिरी म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जत तालुक्यातील कळंब पोहि या गावी ही घटना 2 फेब्रुवारी 2001 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी अनिल गणपत राणे हे वीटभट्टीवरील काम आटपून घरी पोहि येथे परतले असता त्यांची गर्भवती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत आढळली. त्यावेळी आरोपी संतोष राणे याचा कौटुंबिक कारणावरून सख्या भावजयसोबत वाद झाला होता. संतापाच्या भरात आरोपीने घरातील कुऱ्हाड उचलून मानेवर, डोक्यावर, हातावर आणि दंडावर सलग घाव करून महिलेचा जागीच खून केला. मृत महिला नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने हा दुहेरी खून ठरला होता.
घटनेनंतर आरोपी तात्काळ गाव सोडून फरार झाला. या प्रकरणी फिर्यादी अनिल राणे यांनी आपल्या सख्याच भावाविरोधात नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गेल्या दोन दशकांत आरोपीचा माग काढण्यासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील होते; मात्र आरोपी आपले राहते ठिकाण, नाव आणि रोजगार वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. अखेर नेरळ पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल आणि कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या जुन्या खूनगुन्ह्याचा तपास नव्याने हाती घेतला. ढवळे यांनी विशेष पथक स्थापन केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक भास्कर गच्चे, पोलिस शिपाई राजेश केकाण आणि आशू बेंद्रे यांनी सातत्याने तपास सुरू ठेवला.
दरम्यान ढवळे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, सांगवी परिसरात येत असल्याचे समोर आले.
तांत्रिक माहितीची सांगड घालून पथकाने गुप्त सापळा रचला. त्यावेळी आरोपी हा ‘संतोष गणपत पाटील’ या नावाने केटरर्सचे काम करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी फेमस चौक, सांगवी येथे अचूक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. सध्या आरोपीचे वय 49 असून 24 वर्षांच्या फरारीनंतर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. या महत्त्वपूर्ण कारवाईने नेरळ पोलिसांनी आपली तपासक्षमता आणि चिकाटी सिद्ध केली असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करीत आहेत.































