‘चौथ्या स्तंभा’चा सन्मान आणि तारदाळात पत्रकारांसाठी हक्काचं घर!


‘चौथ्या स्तंभा’चा सन्मान आणि तारदाळात पत्रकारांसाठी हक्काचं घर!

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात; स्वतंत्र पत्रकार कक्षाचा ऐतिहासिक श्रीगणेशा

तारदाळ (प्रतिनिधी) :

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे समाज आशेने बघतो, त्या पत्रकारांच्या कष्टाची दखल आज तारदाळ ग्रामपंचायतीने खऱ्या अर्थाने घेतली आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ सत्कार आणि भाषणांचा पाऊस न पाडता, ‘तारदाळ ग्रामपंचायत आवारात स्वतंत्र पत्रकार कक्ष’ स्थापन करण्याचा क्रांतीकारी निर्णय लोकनियुक्त सरपंच सौ. पल्लवी पवार यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एका नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.

असा रंगला सोहळा…

कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रसाद खोबरे, सरपंच सौ. पल्लवी पवार आणि ग्रामविकास अधिकारी श्री. कुमार वंजिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सामाजिक कार्यकर्ते श्री. रणजीत पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला.

शब्दांपेक्षा कृतीवर भर!

सरपंच पल्लवी पवार यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, “पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. त्यांच्या लेखणीतून सामान्यांना न्याय मिळतो. त्यांच्या या योगदानाला बळ देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र ‘पत्रकार कक्ष’ सुरू करत आहोत.” केवळ घोषणा न करता, मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून या कक्षाच्या जागेचा शुभारंभही करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कलमबहाद्दरांचा यथोचित गौरव यावेळी तारदाळमधील ज्येष्ठ पत्रकार श्री. गजानन खोत, श्री. दिलीप खोत, श्री. प्रमोद परीट, श्री. बसगोंडा कडेमणी, श्री. श्रीकांत कांबळे, श्री. प्रवीण केर्ले, श्री. आप्पासो भोसले, श्री. विकास गायकवाड, श्री. दादासो सुतार या सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पत्रकारांनी, “हक्काची जागा मिळाल्यामुळे कामाला नवी दिशा मिळेल,” अशी भावना व्यक्त केली.

या सोहळ्याला भीमराव बनणे, बाबासाहेब महाजन, सुरेश पवार, संदिप खोत, बबलू कोळी, पिंटू माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी कुमार वंजारी यांनी मानले.



47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!