भक्तांच्या श्रद्धेवर डल्ला मारणारा ‘इक्या’ गजाआड !


रसायनी पोलिसांची झटपट कामगिरी; बेलेंत्रा सोसायटीतील चोरीचा छडा

सुनील पाटील :

रसायनी: अहो, कलियुग दुसरं काय असतं? ज्या देवाने सख्या गणपती बाप्पाने साऱ्या जगाचे रक्षण करावे, त्याच बाप्पाच्या पेटीवर हात साफ करायला या कलियुगी चोरांना भीती वाटेनाशी झाली आहे! रसायनीच्या बेलेंत्रा सोसायटीत भरवस्तीत असलेल्या गणेश मंदिरात चोरी झाली आणि परिसरात एकच कल्लोळ माजला. देवाच्या दारातही आता चोरांचा सुळसुळाट झाला, तर सामान्य माणसाने जायचं कुठे? असा जळजळीत प्रश्न साऱ्यांच्या मनात उभा ठाकला होता.

रात्रीचा खेळ अन् दानपेटी गायब !

प्रकरण असं की, १७ मार्चच्या त्या काळरात्री कोणीतरी अज्ञाताने थेट मंदिराच्या गाभाऱ्यात शिरकाव केला. अहो, देवाची भीती नाही की कायद्याचा धाक! या चोरा महाशयांनी थेट दानपेटीच लंपास केली. १८ मार्चच्या सकाळी जेव्हा भक्तांना हा प्रकार समजला, तेव्हा साऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ज्ञानेश्वर सोपान गायकवाड यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमाखाली गुन्हा नोंदवला गेला.

पोलिसांचा दणका !

पण म्हणतात ना, ‘कायद्याचे हात लांब असतात!’ स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि त्यांच्या पथकाने अशी काही चक्रं फिरवली की चोराला पळता भुई थोडी झाली. सीसीटीव्हीचे डोळे आणि खबऱ्यांची कानं यांच्या मदतीने पोलिसांनी थेट चावणे गावातील ‘एकनाथ ऊर्फ इक्या सिताराम कातकरी’ या २५ वर्षांच्या पठ्ठ्याला गाठलं.

‘इक्या’ची कबुली अन् समाधान

पोलिसांच्या हिसक्यासमोर तो इक्या किती वेळ टिकणार? त्याने लगेच पोपटासारखी चोरीची कबुली दिली. ज्या हातांनी बाप्पाला नमस्कार करायचा, त्याच हातांनी दानपेटी चोरणाऱ्या या पठ्ठ्याला आता पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. सहाय्यक फौजदार संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीमुळे रसायनीतील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील तपास सुरू आहे. पण एक मात्र नक्की, बाप्पाच्या दरबारात चोरी करणाऱ्याला पोलिसांनी असा काही अद्दल घडवला आहे की, पुन्हा देवाच्या वाट्याला जाण्याची कुणाची हिंमत होणार नाही!

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!