भाजीला ‘केवायसी’ आणि जेवायला ‘हप्ते’! … …सरकारच्या दरबारात सामान्यांचा जीव टांगणीला!”
मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार :
नमस्कार!
सध्याच्या काळात सामान्य माणसाने सकाळी डोळे उघडले की त्याला देवाची मूर्ती दिसत नाही, तर त्याला दिसतो गॅसचा सिलिंडर, पेट्रोलचा आकडा आणि दुधाची पिशवी! पुण्यातल्या चितळ्यांचं दूध ६४ रुपये लिटर झालंय. अरे, इतकं महाग दूध प्यायल्यावर माणसाच्या अंगात शक्ती येईल की त्याच्या खिशाला ‘अॅनिमिया’ होईल, याचा विचार कुणी करायचा? पूर्वी लोक म्हणायचे, ‘संसार करावा नेटका’. आता लोक म्हणतायत, ‘संसार नको ग बाई, त्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा!'”

भाजी की ‘केवायसी’?
“संध्याकाळी नवरा थकून-भागून घरी येतो. बायको विचारते, ‘आज भाजीला काय करू?’ शंभर रुपयात दोन भाज्यांचा पाला येतो. नवरा वैतागून म्हणतो, ‘अगं, भाजी काय विचारतेस? त्यापेक्षा माझं ‘केवायसी’ कर, नाहीतर आधार कार्ड लिंक कर!’ आजकाल संसारात प्रेमाच्या गप्पा कमी आणि पॅन-आधार लिंक करण्याच्या धमक्या जास्त ऐकू येतात.”
कपड्यांची ‘लक्तरे’ आणि पाचशेचा ‘बनियान’
“महागाईने आज माणसाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. अहो, साधी अंडरवेअर आणि बनियान घ्यायचं म्हटलं तरी आज पाचशे रुपये लागतात! माणसाला प्रश्न पडतो, हे वस्त्र वापरावे की न वापरता तसेच फिरावे? गरिबाच्या अंगावरची बनियान आधीच ‘जाळीदार’ झालेली असते, पण नवीन घ्यायची सोय नाही. सरकार म्हणतंय ‘डिजिटल इंडिया’, पण इकडे माणसाला आपली लज्जा झाकायला पाचशे रुपयांचा खिसा रिकामा करावा लागतोय. ही अवस्था पाहून ‘दिगंबर’ होण्याची वेळ आली आहे असं वाटतं!”
तणावातून व्यसनाकडे: संसाराची राखरांगोळी
“दिवसभर कामाचं ओझं आणि घरी आल्यावर हा महागाईचा तडाखा! हा प्रचंड मानसिक तणाव सहन करायचा कसा? आजचा सामान्य माणूस या विवंचनेत इतका भरडला जातोय की, त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो व्यसनाधीन होऊ लागला आहे. कोणाला दारूचा आधार वाटतोय, तर कोणाला तंबाखूचा! पण साहेब, व्यसनाने तणाव कमी होत नाही, उलट संसाराची उरलीसुरली राखरांगोळी होते. गरिबाच्या घरातला पैसा आधीच कमी, त्यातला अर्धा ‘पावशा’ आणि ‘पुड्यां’वर उडायला लागला, की म्हातारपण यायच्या आधीच घरं उद्ध्वस्त होतात.”
बँकांचा जाच आणि आजारांचा ‘बाजार’
“बँका तर अशा टपून बसल्यात की विचारू नका. खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवा म्हणतात. अरे, खिशात ‘मॅक्झिमम’ भोकं पडलेली असताना बॅलन्स कुठून ठेवणार? त्यात चुकून आजारी पडलात, तर हॉस्पिटल म्हणजे लुटीचा अड्डाच! हृदयविकार झाला, तर घर विकायलाच काढायचं. म्हणजे हृदय धडधडत ठेवायला डोकं गहाण ठेवायची वेळ आली आहे.”
शिक्षण की ‘खंडणी’ आणि ‘नंबर प्लेट’
“शाळेत पोराचं ऍडमिशन म्हणजे जणू काही खंडणीच! लाखो रुपये डोनेशन आणि वरून कोचिंग क्लासेसचा खर्च. हे सगळं करताना रात्रीची झोप उडते. त्यात सरकारची मज्जा बघा! गॅस हजार रुपये, पेट्रोल शंभर पार! आणि आता नवीन फतवा- ‘HSRP नंबर प्लेट’ लावा! अरे, गाडीत पेट्रोल भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही नंबर प्लेटवर काय नक्षी काढताय? लाख रुपये कमवून सुद्धा माणूस भाड्याच्या खोलीतच राहतोय.”
“थोडक्यात काय, तर सध्याच्या काळात जगणं महाग झालंय आणि मरणं तर त्याहून महाग झालंय. आता फक्त हिमालयात जाऊन संन्यास घेणेच बाकी उरले आहे, पण तिथे गेल्यावरही एखादा सरकारी बाबू येऊन म्हणेल- ‘महाराज, संन्यास घ्यायचा असेल, तर आधी तुमचं आधार कार्ड हिमालयाशी लिंक करा!‘”


























