मावळ गौण खनिज प्रकरण : पुणे जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी बेमुदत संपावर..!

पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने गौण खनिज प्रकरणात मावळ तालुक्यातील ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी, आणि २ ग्राम महसूल अधिकारी यांना राज्य सरकारने निलंबित केल्याच्या निषेधार्थ आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता अन्यायकारक पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप करत, जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका आणि गावपातळीवरील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय
राज्य संघटनेच्या निर्देशानुसार आंदोलक संघटनांनी न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोमवारपासून निलंबन मागे घेईपर्यंत सर्व अधिकारी-कर्मचारी सामुहिक रजेवर जात असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
या आंदोलनात तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना, वाहनचालक संघटना व महसूल सेवक संघटना यांचा सहभाग आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासकीय कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. महसूल विभागाच्या या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





























