पोलीस बळाचे संचलन; देहूरोडमध्ये भीमजयंतीचा उत्साह आणि सुरक्षेचा दबदबा!


पोलीस बळाचे संचलन; देहूरोडमध्ये भीमजयंतीचा उत्साह आणि सुरक्षेचा दबदबा!

देहूरोड: प्रतिनिधी (प्रेस मीडिया लाईव्ह)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, कुठेही गालबोट लागू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी देहूरोड पोलिसांनी आज शहराच्या मुख्य भागांतून जोरदार पथसंचलन केले. पोलीस दलाचा हा भव्य फौजफाटा रस्त्यावर उतरलेला पाहून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, “पोलीस दल सज्ज आहे” असाच संदेश यातून देण्यात आला.

यंदाची जयंती निर्विघ्न पार पडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर आणि परिमंडळ ४ च्या सहायक पोलीस आयुक्त श्वेता खेडकर यांनी यापूर्वीच देहूरोड पोलीस ठाण्यात दोन वेळा सामाजिक व राजकीय संघटनांची बैठक घेतली होती. याच नियोजनाचा भाग म्हणून आज हे संचलन करण्यात आले.

आंबेडकर नगर येथील जामा मशीद परिसरापासून या पथसंचलनाला सुरुवात झाली. तिथून स्वामी विवेकानंद चौक, सरनोबत चौक, गांधीनगर, शितळानगर, गजबजलेली बाजारपेठ अशा संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणांहून संचलन करत देहूरोड अंकित पोलीस चौकी येथे याची सांगता झाली. यावेळी राज्य राखीव पोलीस दल (SRPF), दंगल नियंत्रण पथक आणि होमगार्डचा मोठा ताफा सोबत होता.

शहराच्या दोन्ही बाजूंनी शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या या पथसंचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पोलिसांनी जनतेला आवाहन केले की, “कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.” एकूणच या शक्तीप्रदर्शनामुळे शहरात प्रशासनाचा वचक निर्माण झाला असून सर्वत्र शांततेत उत्सव साजरा होत असल्याची चर्चा आहे.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!