नायक, निर्माता अन् दिग्दर्शक: अभिनयाच्या दरबारातला ‘फालमफोक’ अष्टपैलू गडी – योगेश खिलारे..!
मेहबूब सर्जेखान ज्येष्ट संपादक :
म्हणतात ना, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!’ पण योगेशच्या बाबतीत हे पाय पाळण्यात नाही, तर वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी अकलूजच्या बादशाही रंगमंचावर थिरकताना दिसले! ज्या वयात मुलं खेळण्यांशी खेळतात, त्या वयात हा गडी नृत्याच्या तालावर स्मृती भवनाचा रंगमंच गाजवत होता. तिथूनच या कलावंताच्या भविष्यातील ‘बादशाही’ प्रवासाची नांदी घुमली होती.
॥ मूर्ती लहान, कीर्ती महान ॥
पुण्याचे जावई असलेले योगेश खिलारे म्हणजे एक उमदा आणि रसाळ व्यक्तिमत्व! बोलण्यात जणू साखरेचा गोडवा, पण कर्तृत्वात मात्र वाघाचा दरारा! शरीरयष्टीने कदाचित लहान वाटतील, पण त्यांनी गाजवलेली कामगिरी आणि मिळवलेले ‘राज्य पुरस्कार’ त्यांच्या कष्टाची उंची आभाळाएवढी मोठी आहे, हेच सिद्ध करतात.
त्रिवेणी संगम: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक!
मराठी सिनेसृष्टीत अभिनेता होणे सोपे आहे, पण एकाच वेळी नायक, निर्माता आणि दिग्दर्शक अशी तिहेरी धुरा वाहणे म्हणजे निखारे पायाखाली तुडवण्यासारखे आहे! योगेश खिलारे यांनी केवळ कॅमेऱ्यासमोर अभिनय केला नाही, तर कॅमेऱ्यामागचा ‘कॅप्टन’ म्हणूनही आपली हुकूमत गाजवली आहे. स्वतःची निर्मिती संस्था उभी करून, नवनवीन विषयांना दिग्दर्शकीय कल्पकता देऊन त्यांनी सिनेसृष्टीला चकित केले आहे.
यशाचा ‘फालमफोक’ प्रवास!
कोरिओग्राफर म्हणून हाताला लय आणि अभिनयाची ओढ घेऊन निघालेल्या या तरुणाने ‘डीजे काळुराम’पासून जो प्रवास सुरू केला, तो आज थेट महाराष्ट्र शासनाच्या **’कै. काशिनाथ घाणेकर पुरस्कारा’**पर्यंत येऊन ठेपला आहे. ‘इंटरनॅशनल फालमफोक’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयासोबतच निर्मिती आणि दिग्दर्शनाचा जो कस लावला, त्याचे फळ म्हणजे आज त्यांच्या खात्यात अनेक आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार जमा आहेत.
२०२५ मध्ये ‘एक राज’, ‘केळफा’ आणि ‘माईक’ यांसारखे चित्रपट पूर्ण करून योगेश आता ‘वन इन अ मिलियन’ या भव्य चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. एक हरहुन्नरी नायक, खंबीर निर्माता आणि कल्पक दिग्दर्शक अशा तिन्ही रूपांत त्यांचा हा वारू असाच उधळत राहो, हीच सदिच्छा!





























