कल्याण-मुरबाड महामार्गावर मृत्यूचे तांडव: ११ जणांची राखरांगोळी, जबाबदार कोण?


कल्याण-मुरबाड महामार्गावर मृत्यूचे तांडव : ११ जणांची राखरांगोळी, जबाबदार कोण?

ठाणे : सुनील पाटील :

रक्ताने माखलेला रस्ता, चक्काचूर झालेला लोखंडाचा गोळा आणि त्या ढिगाऱ्यात अडकलेले निष्पाप माणसांचे देह! आज कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायते पुलावर मृत्यूने जे तांडव घातले, ते पाहून पाषाणहृदयी माणसाच्या डोळ्यांतूनही रक्ताश्रू येतील. एका बाजूला सिमेंटचा अक्राळविक्राळ मिक्सर आणि दुसऱ्या बाजूला प्रवाशांनी गच्च भरलेली ती दुर्दैवी इको गाडी—यांच्यात समोरासमोर झालेली टक्कर म्हणजे निव्वळ अपघात नाही, तर हा व्यवस्थेने केलेला नरसंहार आहे!

या भीषण अपघातात ११ जीवांची अक्षरशः राखरांगोळी झाली. त्यामध्ये ८ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. काळजाला घरे पाडणारी गोष्ट म्हणजे, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील स्नेहा, मानसी आणि प्रथमेश या तरुण भावंडांचा समावेश आहे. कोणाचे तरी कुंकू पुसले गेले, कोणाची तरी म्हातारपणाची काठी मोडली, तर कोणाचे सोन्यासारखे संसार एका क्षणात धुळीला मिळाले. मुरबाड तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक भूषण घोरपडे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारीही या काळाच्या विळख्यातून सुटला नाही.

हे रस्ते आहेत की मृत्यूचे सापळे?
रस्त्याचं काम सुरू आहे, म्हणून गाड्या वेगात येतात आणि मरतात? ही कुठली अजब तर्कशास्त्रीय भंपकबाजी प्रशासन करतंय? रस्ता दुरुस्त करणं तुमचं काम आहे, पण तिथे सुरक्षा नियमांची ऐशीतैशी का? त्या अरुंद पुलावर वाहनांच्या वेगाला लगाम घालायला तिथे काय कोणाचे बाप येणार होते? क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी त्या व्हॅनमध्ये भरले जात असताना आरटीओचे ‘कार्यक्षम’ अधिकारी कोणत्या बिळात जाऊन बसले होते?

मदतकार्यासाठी धावलेले ‘हेल्प फाउंडेशन’चे तरुण आणि स्थानिक नागरिकांनी जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण प्रश्न उरतोच—लोकांनी फक्त प्रेतं उचलण्यासाठीच का जन्माला यायचं?

प्रशासनाला आमचा सवाल आहे—
या ११ मृत्यूंची जबाबदारी कोणाची? त्या उद्ध्वस्त झालेल्या घरांची भरपाई तुमच्या कोरड्या शब्दांनी होणार आहे का? रायते गावाजवळचा हा पूल आता ‘मृत्यूचा पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागलाय, तरीही प्रशासनाचे डोळे उघडायला अजून किती रक्ताचा अभिषेक हवा आहे?
देवगावचे प्रशांत चंदने असोत की साखरेचे अनंता पवार, या प्रत्येकाच्या मागे एक कुटुंब होतं, एक स्वप्न होतं. आज ती सगळी स्वप्नं त्या सिमेंट मिक्सरच्या लोखंडी चक्राखाली चिरडली गेली आहेत. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला असून, आता तरी सरकारने आणि रस्ते विभागाने आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे, अन्यथा जनतेचा हा संताप उद्या वणवा होऊन पेटल्याशिवाय राहणार नाही!

47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!