बाबुराव शिंदेंच्या सात पुस्तकांचा विक्रम; ‘रेगे’ सभागृहात साहित्याची दिपोत्सव !
ठाणे: “लेखकाच्या लेखणीत समाजाचे काळीज धडधडत असते. ही लेखणी जोपर्यंत संवेदना जिवंत ठेवते, तोपर्यंत हा समाज आणि संस्कृती अमर आहे!” अशा शब्दांत प्रख्यात वक्त्या आणि लेखिका पौर्णिमा शिंदे यांनी ठाण्याच्या व्यासपीठावर जणू वैचारिक तोफा डागल्या. तेजस्वी फाऊंडेशन, ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
शब्दांचा महायज्ञ: साहित्याच्या या महाकुंभात लेखक बाबुराव लक्ष्मीबाई बळीराम शिंदे यांच्या सात पुस्तकांनी अक्षरशः इतिहास घडवला. “याला जीवन असे नाव”, “माझं काय चुकलं?”, “माही”, “निष्पाप”, “काळरात्र”, “कोवळं मन”, “पहिल्या वळणावर” आणि “मिठी” या पुस्तकांचे प्रकाशन पौर्णिमा शिंदे यांच्या हस्ते झाले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. एकाच वेळी सात पुस्तकांचे प्रसव होणे, ही साहित्याची मोठी सेवाच आहे!
काव्याची बरसात: केवळ गद्यच नव्हे, तर पद्याचाही येथे गौरव झाला. श्रीप्रकाश सप्रे यांचा “मनातल्या मनात” आणि “कविता डॉट कॉम” या काव्यसंग्रहांचा सुगंधही या सोहळ्यात दरवळला. प्रा. मनिष पंडित यांनी आपल्या रसाळ सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
ठाणेकरांच्या साक्षीनं पार पडलेला हा सोहळा म्हणजे साहित्याच्या दरबारातील एक देदिप्यमान पान ठरले आहे. पौर्णिमाजींच्या शब्दांनी आणि बाबुरावांच्या लेखणीने आज साहित्याचा विजय झाला, एवढेच आम्हास म्हणायचे आहे!



























