राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर – राज्य निवडणूक आयोगाचा आदेश
मुंबई : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम–२०२५ जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने हा आदेश सर्व महानगरपालिका आयुक्तांना पाठविण्यात आला असून, मतदार यादीतील सुधारणांची प्रक्रिया आता ठराविक वेळापत्रकानुसार पार पाडली जाणार आहे.
या सुधारित वेळापत्रकानुसार निवडणुकीच्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीतील अद्ययावत व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी पुढील कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे:
🔹 १४ नोव्हेंबर २०२५ — राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीनुसार तयार केलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
🔹 २२ नोव्हेंबर २०२५ — प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख.
🔹 ०६ डिसेंबर २०२५ — दाखल हरकतींचा निपटारा करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाईल.
🔹 ०८ डिसेंबर २०२५ — मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
🔹 १२ डिसेंबर २०२५ — मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तत्काळ ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तांत्रिक कारणांसाठी आयोगातील श्री. समीर गंधपवार (संगणकीकरण कक्ष) यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले असून, संपर्क क्रमांक ०२२-२२८८६९५० / २२०२२९०९ तसेच ई-मेल sec.compu@mah.gov.in उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मतदार यादीचा संपूर्ण कार्यक्रम आणि अद्ययावत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर https://mahasec.maharashtra.gov.in/ येथे पाहता येईल.
या आदेशाच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी आणि सर्व महानगरपालिका आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, “मतदार यादी सुधारित करणे हा निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, प्रत्येक मतदाराचा योग्य समावेश व्हावा आणि यादी पारदर्शक राहावी, हे आमचे प्राधान्य आहे.
या सुधारित कार्यक्रमामुळे राज्यातील २९ महानगरपालिकांमधील निवडणुकांची तयारी औपचारिकरित्या सुरू झाली आहे. नागरिकांना आपल्या नावाचा समावेश, वगळणे अथवा दुरुस्ती याबाबत वेळेत अर्ज करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.





























