जिद्दीचा ‘लक्ष्मी’बनसोडे ! प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय देऊन आर. एम. हायस्कूलच्या कन्येची गरुडझेप!

सांगली जिल्हा प्रतिनिधी: अशोक मासाळ
मिरज : अरे, जिद्द कोणाला म्हणतात? चिकाटी कशाला म्हणतात? ज्याच्या नशिबात अठराविश्वे दारिद्र्य वाढून ठेवलेलं असतं, त्याच्या डोळ्यात स्वप्नांचं काजळ नसतं, तर संघर्षाची आग असते! हीच आग मिरजच्या ‘आर. एम. हायस्कूल’मध्ये शिकणाऱ्या लक्ष्मी बनसोडे हिच्या डोळ्यात आज लख्खपणे चमकताना दिसतेय. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) या पोरीनं मिळवलेलं यश म्हणजे निव्वळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो एका गरिबाच्या मुलीने परिस्थितीच्या नरडीला दिलेला पिळ आहे!
दारिद्र्याचे काटे आणि यशाचे आकाश
लक्ष्मीची परिस्थिती काय? घरात अडचणींचा डोंगर, हाती साधनांची कमतरता आणि पाठीवर संकटांचं ओझं. पण लक्ष्मीने हार मानली असती तर ती ‘लक्ष्मी’ कसली? तिने रडत बसण्यापेक्षा लढण्याचा मार्ग निवडला. वास्तवातील अंधाराला घाबरून न जाता, तिने स्वतःच्या परिश्रमाच्या वातीने यशाचा दिवा लावला. दिवसरात्र एक करून तिने अभ्यासाचा जो ‘यज्ञ’ मांडला, त्या यज्ञाच्या समिधेतूनच आज यशाची ही लखलखती ज्योत बाहेर आली आहे.
गुरुवर्य: विजयाचे शिल्पकार
अत्रे साहेब नेहमी म्हणायचे, “गुरुविण कोण दाखविल वाट?” या यशात लक्ष्मीच्या कष्टाला खऱ्या अर्थाने दिशा दिली ती आर. एम. हायस्कूलच्या शिक्षकांनी. श्री. राजू शिंदे सर, सौ. कोकरे मॅडम आणि सौ. थोरात मॅडम यांनी केवळ पुस्तकी ज्ञान पाजळलं नाही, तर या कन्येच्या पंखात आत्मविश्वासाचं बळ भरलं. जेव्हा जेव्हा ही पोरगी डगमगली, तेव्हा तेव्हा या शिक्षकांनी तिच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, “लक्ष्मी, तू फक्त लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत!” त्यांच्या मार्गदर्शनाचे आज सोने झाले आहे.
संस्थेचे कणखर नेतृत्व
शाळेचे वातावरण हे एखाद्या कारखान्यासारखे नसते, तर ते विचारांच्या मशागतीचे शेत असते. संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद जाधव सर आणि सचिव श्री. राहुल साळुंखे सर यांच्या दूरदृष्टीमुळेच शाळेत बाह्य परीक्षांची ही ऊर्मी निर्माण झाली. ‘विद्यार्थी घडला तरच राष्ट्र घडेल’ या ध्यासापोटी त्यांनी जे नियोजन केले, त्याचाच परिणाम म्हणजे आज संस्थेच्या सर्व विद्यालयांमध्ये यशाचा हा सडा पडला आहे. मुख्याध्यापकांच्या सक्षम नेतृत्वाखाली शाळेत जे शैक्षणिक चैतन्य निर्माण झाले आहे, त्याचे कौतुक करावे तितके थोडेच!
मिरजेचा गौरव..!
लक्ष्मी बनसोडेचे हे यश म्हणजे केवळ एका विद्यार्थिनीचा विजय नाही, तर तो कष्टकरी वर्गाच्या जिद्दीचा जयघोष आहे. प्रतिकूलतेवर मात करून मिरजेच्या आर. एम. हायस्कूलचा ध्वज तिने आज गगनभेदी केला आहे.
अरे, नशीब कोणाच्या बापाचं नसतं ! लक्ष्मीने हे सिद्ध केलंय की, ज्याच्या मनगटात जिद्द आणि मेंदूत अभ्यास असतो, त्याच्या चरणाशी यश स्वतःहून लोटांगण घालतं.
आज संपूर्ण मिरजेत आणि सांगली जिल्ह्यात या ‘यशस्विनी’ लक्ष्मीचे कौतुक होत आहे. अशा या गुणी मुलीचे आणि तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या समस्त गुरुजनांचे करावे तितके अभिनंदन थोडेच!































