सरकार चालले ‘खोक्या’वर आणि पोलीस धावले गद्दारांच्या ‘तिरडी’वर! पुण्यात शिवसैनिक-पोलिस जुगलबंदी!!


 सरकार चालले ‘खोक्या’वर आणि पोलीस धावले गद्दारांच्या ‘तिरडी’वर! पुण्यात शिवसैनिक-पोलिस जुगलबंदी!!

पुणे : सध्याच्या राजकारणात पक्षांतर आणि उड्या मारणे हा जरी ‘राष्ट्रीय खेळ’ झाला असला, तरी पुणेरी शिवसैनिकांना मात्र हा खेळ जरा जास्तच जीव्हारी लागलेला दिसतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडून येऊन, नंतर अचानक ‘सहा फुटीर वीर’ बनलेल्या त्या खासदारांच्या विरोधात काल रस्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकात शिवसेना पुणे शहराच्या वतीने एक आगळेवेगळे ‘श्राद्ध आंदोलन’ पार पडले.

प्रसंग होता गद्दार खासदारांच्या राजकीय मयतीचा! शिवसैनिकांनी मोठ्या निष्ठेने आणि पुणेरी उत्साहाने गद्दारांच्या राजकीय मयतीचे प्रतीक म्हणून एक देखणी ‘तिरडी’ सजवून आणली होती. पण म्हणतात ना, “पुण्यात आलात आणि पोलिसांनी अडवले नाही, तर तुम्ही पुण्यात नाहीच!” नेमके तेच घडले. आंदोलक घोषणा देणार तोच पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत थेट त्या ‘तिरडी’लाच ताब्यात घेतले.

गद्दारांना तर सुरक्षा मिळतेच, पण आता त्यांच्या तिरडीलाही पोलीस संरक्षण मिळावे, हा लोकशाहीचा नवा चमत्कार पाहून उपस्थित शिवसैनिक अवाक झाले. यावरून पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये चांगलाच ‘शाब्दिक जुगलबंदी’चा कलगीतुरा रंगला. संतापलेल्या शिवसैनिकांनी मग जो काही सूर लावला, त्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला:

“तिरडीला सुरक्षा देणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय!”

आता तिरडी जप्त झाली म्हणून आंदोलन थोडेच थांबणार? पुणेरी बाणा दाखवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आणि उद्धवजींच्या नेतृत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही,” असा संतप्त सूर यावेळी उमटला. ‘खोके’ खाऊन ‘बोके’ झालेल्या या खासदारांना आगामी निवडणुकीत जनताच ‘करेक्ट कार्यक्रम’ करून घरी बसवेल, असा निर्धार उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

या ‘तिरडी बचाव’ आंदोलनाचे नेटके आयोजन विभागप्रमुख उत्तम भुजबळ यांनी केले होते. या वेळी सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहरप्रमुख वसंत मोरे, नितीन गावडे यांच्यासह पद्मा सोरटे, कविता सोनवणे, युवराज पारिख आणि वैभव दिघे अशा असंख्य निष्ठावंतांची मोठी फौज हजर होती.

एकंदरीत, खासदारांनी पक्ष बदलला तरी शिवसैनिकांचा आक्रमक मूड आणि पुणे पोलिसांची कार्यतत्परता अजिबात बदललेली नाही, हेच या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!