साडेतीन वर्षांच्या ‘त्या’ चिमुरडीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची ऐतिहासिक शिक्षा 


साडेतीन वर्षांच्या ‘त्या’ चिमुरडीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची ऐतिहासिक शिक्षा

पुणे, दि. २९ जून (प्रतिनिधी – चंद्रशेखर पात्रे):

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर निकाल दिला आहे. ६५ वर्षीय पाशवी वासनांध नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने ‘मरेपर्यंत फाशीची’ जाहीर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.

न्यायालय कक्षात शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी अत्यंत कठोर शब्दांत “आता फासावर चढा!” असे शब्द थेट भीमरावला उद्देशून काढले. आपल्या पोटच्या गोळ्यावर झालेल्या अनन्वित अत्याचाराचा सूड न्यायाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचे पाहून पीडित चिमुरडीच्या कुटुंबाला न्यायालयातच अश्रू अनावर झाले. हा निकाल ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा श्वास सोडला असून, सर्व स्तरातून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.

निकालपत्राचे वाचन करताना न्यायमूर्तींनी आरोपीच्या कृत्यावर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. आरोपीचा पूर्वेतिहास अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून, स्वतःची वासना शमवण्यासाठी त्याने साडेतीन वर्षांच्या असहाय्य चिमुरडीवर हे कृत्य केल्याचे सिद्ध झाले आहे, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. आरोपीचे वय ६५ वर्षे असले, तरी त्याला अजिबात दया दाखवता येऊ शकत नाही; कारण चिमुरडीच्या हत्येनंतरही आरोपीने अत्याचार सुरू ठेवला, हे कृत्य क्रूरतेची परिसीमा गाठणारे आहे. हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ म्हणजेच दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत येत असल्याने, हा नराधम केवळ आणि केवळ फाशीच्या शिक्षेस पात्र असून त्याचे कृत्य माफीच्या लायकीचे नाही, असे न्यायालयाने निक्षून सांगितले.

या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडताना आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी लावून धरली होती. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेसोबत केलेले कृत्य अतिशय अमानुष आणि राक्षसी आहे, अशा नराधमामध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने संपूर्णपणे ग्राह्य धरला.

१ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी नसरापूर येथे ही अत्यंत संतापजनक घटना घडली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून नराधम भीमरावच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी अहोरात्र एक करून अवघ्या १५ दिवसांच्या आत १२४० पानांचे अत्यंत भक्कम व सज्जड पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. १६ व्या दिवशी आरोप निश्चित झाले आणि अवघ्या दोन महिन्यांत पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला. या अद्भूत आणि कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या नराधमाला झालेल्या फाशीच्या शिक्षेचे आणि कायद्याच्या या वेगवान दणक्याचे संपूर्ण राज्यातून जाहीर स्वागत होत आहे. अशा नराधमांना समाजात जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, हेच या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!