नवऱ्याला उदंड आयुष्य मागताना, गावाला रोगराई देऊ नका! वटपौर्णिमेच्या शुभेच्छेसोबतच वडगाव प्रशासनाचा स्वच्छतेचा ‘कडक’ डोस!

खालापूर / सुनील पाटील :
येत्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत वडगाव प्रशासनाने एक आगळावेगळा आणि संविधानातील कर्तव्यांची आठवण करून देणारा मार्मिक संदेश जारी केला आहे. एकीकडे हद्दीतील सर्व नागरिकांना आणि माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतानाच, प्रशासनाने गावाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी भारतीय संविधानाने नागरिकांवर सोपवलेल्या मूलभूत कर्तव्यांची कडक आठवण करून दिली आहे.
ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “वटवृक्षाप्रमाणे तुमचे नातेही दीर्घायुष्य, प्रेम आणि विश्वासाने दृढ राहो. या मंगलमय दिवशी तुम्हाला अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच सदिच्छा!”
परंतु, सण साजरा करतानाच आपल्या हातातील कचरा कचरापेटीत टाकणे हे केवळ एक आवाहन नसून, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१-अ (छ) नुसार नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि गावातील सार्वजनिक आरोग्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कायदेशीर व संविधानात्मक कर्तव्य आहे, याकडे प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष वेधले आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार खालील नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे:
-
१. कचऱ्याचे वर्गीकरण (स्त्रोत अलगीकरण): ओला कचरा (उदा. भाजीपाला, खरकटं अन्न) आणि सुका कचरा (उदा. प्लॅस्टिक, कागद) कधीही एकत्र करू नये. ते वेगवेगळ्या डब्यात ठेवावे. वापरलेली बालकांची विष्ठा-वस्त्रे किंवा सॅनिटरी पॅड (वैद्यकीय कचरा) वेगळे सुरक्षितपणे गुंडाळूनच द्यावेत.
-
२. कचरा विल्हेवाट नियम: कचरा नेहमी ग्रामपंचायतीने दिलेल्या कचराकुंडीत किंवा कचरा गोळा करणाऱ्या गाडीतच टाकावा. उघड्यावर, रस्त्यावर, नाल्यात किंवा नदीकाठी कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्यास ग्रामपंचायतीकडून थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
संविधान आणि स्वच्छता पाळण्याचे महत्त्व सांगणारी मुख्य घोषवाक्ये:
कचराकुंडीचा वापर करू, सुंदर गाव निर्माण करू.
स्वच्छता पाळा, रोगराई टाळा.
जिथे स्वच्छता असे, तिथे आरोग्य वसे.
सण साजरा करतानाच संविधानाचा आदर राखून, ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग’ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गाव स्वच्छ व रोगराईमुक्त ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिक सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
– आदेशान्वये:
प्रशासक / ग्रामसेवक तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी,
ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, ता. खालापूर.




























