पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वेचा गौरवशाली प्रवास ; चौपदरीकरणाच्या निधीमुळे प्रवाशांच्या आशा पल्लवित
चंद्रशेखर पात्रे :
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ पट्ट्यातील लाखो प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे सेवेने (लोकल) आपल्या प्रवासाची ४८ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. ११ मार्च २०२६ रोजी या ईएमयू (EMU) सेवेचा वर्धापन दिन रेल्वे अधिकारी आणि विविध प्रवासी संघांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विजेवरच्या लोकलचा ऐतिहासिक प्रवास
पुणे रेल्वे विभागातील उपनगरीय सेवेची सुरुवात ११ मार्च १९७८ रोजी झाली. पहिली ‘इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (EMU) लोकल धावली आणि खऱ्या अर्थाने पुण्याच्या दळणवळणात क्रांती झाली. ६३.८७ किलोमीटरचा हा मार्ग आज विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, व्यापारी आणि हजारो चाकरमान्यांसाठी ‘लाईफलाईन’ ठरला आहे. २००९ मध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १२ डब्यांच्या गाड्या सुरू करण्यात आल्या, तर २०१७ मध्ये आधुनिक सीमेन्स रेक दाखल झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर झाला.
वर्धापन दिनी समस्यांचा पाढा
वर्धापन दिनाचा आनंद साजरा होत असतानाच प्रवाशांनी आपल्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रेल्वे प्रवासी मयुरेश जव्हेरी यांनी सांगितले की, “सिग्नल यंत्रणा अद्ययावत होऊनही लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत. कोरोना काळापासून बंद झालेल्या दुपारच्या फेऱ्या आणि कर्जत पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही. मुंबईच्या धर्तीवर दर १० ते १५ मिनिटांनी लोकल सोडण्याची गरज आहे, जेणेकरून दुसऱ्या पाळीत काम करणाऱ्या कामगारांचे हाल थांबतील.”
५१०० कोटींच्या निधीमुळे प्रकल्पाला गती
रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष इक्बाल (भाईजान) मुलाणी यांनी माहिती दिली की, “पुणे-लोणावळा चौपदरीकरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील ३० टक्के हिस्सा (७६५ कोटी रुपये) राज्य सरकार देत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ‘एमआरव्हीसी’ला आर्थिक वाटा देण्याचा निर्णय झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग स्वतंत्र होतील आणि प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होईल.”
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला सिनिअर डी.ई.ई. दिपक भाटी, डेपो इंचार्ज बी. दामोदर, रजत सोनावले, पानीग्रही, विशाल माने, सागर भिल आणि बाळासाहेब टोणे उपस्थित होते. सर्व उपस्थित रेल्वे प्रेमींनी केक कापून आणि शुभेच्छा देऊन लोकलचा वाढदिवस साजरा केला.




























