विद्येच्या माहेरघरात चंद्रकांतदादांना ‘शिक्षण’ देण्याची वेळ; ‘आप’कडून थेट पंजाबच्या विमानाचे तिकीट बुक

पुणे महानगरपालिकेच्या शाळा खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा घाट घातला गेल्यानंतर पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या खाजगीकरणाचे जोरदार समर्थन केल्याने शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर सुधारता येऊ शकत नाहीत, त्यामुळे भारती विद्यापीठ किंवा एसपी कॉलेजने शाळा मागितल्या तर त्या त्यांना चालवायला देऊ,” असा अजब जावईशोध दादांनी पत्रकारांशी बोलताना लावला. दादांच्या या विधानाचा समाचार घेत आम आदमी पार्टीने आता थेट चंद्रकांतदादांना विमानाचे तिकीट देऊन पंजाबला पाठवण्याची तयारी केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या तोंडून “पालकांनाही खाजगी शाळाच हव्यात” असे बेजबाबदार विधान ऐकायला मिळेल, अशी पुण्याच्या जनतेला अजिबात अपेक्षा नव्हती. सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे ही खरं तर सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु, तिथे अपयश आल्यामुळेच आज सर्वसामान्य पालकांना ऐपत नसतानाही भरमसाठ फी भरून मुलांना खाजगी शाळेत टाकावे लागत आहे, या कठोर वास्तवाकडे दादांनी सोयीस्कर डोळेझाक केली आहे.
दादांचा हा ‘खाजगी’ पुळका उतरवण्यासाठी आम आदमी पार्टीने आता कंबर कसली आहे. येत्या सोमवारी, २२ जून २०२६ रोजी ‘आप’चे पदाधिकारी कोथरूड येथील चंद्रकांतदादांच्या कार्यालयात जाऊन त्यांना पंजाबचे विमानाचे तिकीट भेट देणार आहेत. “दादा, एकदा दिल्ली आणि पंजाबला जाऊन या आणि तिथे सरकारी शाळांचा कसा कायापालट झाला आहे ते डोळे उघडून बघून या,” असा खोचक सल्ला ‘आप’ने दिला आहे.
चार वर्षांपूर्वी पंजाबमध्ये शाळांचा देशात २७ वा नंबर लागत होता, परंतु ‘आप’च्या शिक्षण क्रांतीमुळे आज नीती आयोगाच्या अहवालात पंजाब देशात पहिल्या नंबरवर आला आहे. दिल्लीत तर खाजगी शाळांमधून नाव काढून तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. ही शिक्षण क्रांती समजून घेण्यासाठी दादांनी या तिकिटाचा लाभ घ्यावा आणि सरकारी शाळा कशा सुधारतात याचा अभ्यास करावा, अशी आग्रही मागणी डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, संजय कोने, अमोल मोरे, किरण कद्रे आणि नितीन कुटे-पाटील यांनी केली आहे. आता सोमवारी दादा हे तिकीट स्वीकारून पंजाबची वारी करणार की नेहमीप्रमाणे पुण्यातच बसून ‘खाजगी’ पाठराखण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#PuneSchoolPrivatization #ChandrakantPatil #AamAadmiParty #PunePolitics #PMCShala #EducationRevolution #AAPAndolan #Kothrud #PunjabSchoolModel #SaveGovernmentSchools



























