गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला ! १६५ क्विंटल धान्य काळ्याबाजारात जाताना पकडले. 


गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला ! १६५ क्विंटल धान्य काळ्याबाजारात जाताना पकडले. 

प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील

भिवंडी येथील शासकीय गोदामातून शहापूर तालुक्यातील रेशन दुकानात जाणारे १६५ क्विंटल गहू आणि तांदूळ काळ्याबाजारात विकले जात असताना पोलिसांनी ट्रकचालकास अटक करून धान्य जप्त केले, ज्यामुळे प्रशासकीय स्तरावरच्या घोळावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शहापूर : तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ विभागात भात खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोळाची चौकशी सुरू असतानाच भिवंडी येथील शासकीय गोदामातून शहापूर तालुक्यातील अघईमधील रेशन दुकानात नेले जाणारे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक एजाज शहा याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रकमधून १६५ क्विंटल गहू व तांदूळ जप्त केला आहे.

ट्रक शहापुरातील एका खाजगी गोडाऊन समोर कसा काय ? याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून यामुळे शहापूर तालुका शासकीय धानाची काळ्या बाजारात विक्री करण्याचे आगार बनले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून नेणाऱ्या धान्य तस्करांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यातील अघई येथील रेशन दुकानात जाणाऱ्या ट्रकमध्ये १६० क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल गहू असा १६५ क्विंटल धान्य साठा होता. हे धान्य भिवंडी येथील शासकीय गोदमातून शहापूर तालुक्यातील अघई येथील रेशन दुकानात जाणार होते, अशी माहिती शहापुर तहसीलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा अधिकारी अमृता सूर्यवंशी यांनी दिली.

मात्र ट्रकचालकाने धान्याने भरलेला ट्रक काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अघई येथील रेशन दुकानात जाण्याऐवजी शहापूरातील एका खासगी गोदामा लगत उभा केला. याबाबत शहापूर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक वितरणासाठी असलेल्या धान्याचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने दिलेल्या मार्गात बदल केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियमानव्ये शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ट्रक चालक एजाज शहा याला अटक करण्यात आली असून ट्रकमधील तांदळाचे ५० क्विंटल वजनाचे ३२० कट्टे असे १६० क्विंटल तांदूळ व गव्हाचे १० कट्टे असा पाच क्विंटल गहू असा एकूण १६५ क्विंटल धान्यसाठा ट्रकसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली असून शहापुरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

शहापूरच्या गोदामातुन तालुक्यातील रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा होणे क्रमप्राप्त असताना भिवंडी येथून थेट शहापूरच्या रेशन दुकानात धान्याची वाहतूक करण्यात येत असल्याने तसेच एकाच दुकानात तब्बल १६५ क्विंटल धान्य वितरित होत असल्याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे. तसेच धान्याची वाहतूक करणारा ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची तसेच या संबंधित असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी रेशन दुकानदार, गोदामपाल यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!