मिरज शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर  – फिरदौस मुजावर


मिरज शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर  – फिरदौस मुजावर

मिरज: शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले रुंदीकरण आणि मिरासाहेब दर्गा परिसराच्या विकासाकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे नागरिकांना दररोज तीव्र वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी फिरदौस मुजावर यांनी  केली आहे.

 रुंदीकरणाच्या कामाला खिळ

शहरातील मुख्य आणि अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्त्यावर वाहनांची सततची गर्दी आणि अपुरे रुंदीकरण यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. विशेषतः कामाच्या वेळी आणि बाजाराच्या दिवसांमध्ये या रस्त्यावरून पायी चालणेही नागरिकांना जिकिरीचे ठरते. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या उदासीन धोरणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

मिरासाहेब दर्गा परिसराचा विकास दुर्लक्षित

छत्रपती शिवाजी रस्त्याच्या वाहतूककोंडीच्या समस्येबरोबरच, शहराचे एक महत्त्वाचे धार्मिक व ऐतिहासिक स्थळ असलेल्या मिरासाहेब दर्गा परिसराचा विकासही पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. मिरासाहेब दर्गा विकासासाठी कोणतेही भरीव काम झालेले नाही. परिसराच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी फिरदौस मुजावर यांनी केली आहे.

 तातडीच्या उपाययोजनांची मागणी

शहरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने छत्रपती शिवाजी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लावावे आणि मिरासाहेब दर्गा परिसराच्या विकासासाठी ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशासनाने या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर त्वरित लक्ष केंद्रित करावे.

रुंदीकरणाच्या कामातील अडथळे दूर करून ते त्वरित सुरू करावे.

मिरासाहेब दर्गा परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून कामाला गती द्यावी.

नागरिकांच्या या मागणीवर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!