प्रेस मीडिया लाईव्ह पुरस्कार सोहळ्यात ‘रपाटा’ चित्रपटाचे प्रमोशन ; अभिनेता मांगुरे यांच्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
मिरज : प्रेस मीडिया लाईव्हच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मिरज येथील चांदबी लॉन्स येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आगामी मराठी चित्रपट ‘रपाटा’ चे प्रमोशन मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. या सोहळ्याला लाभलेली गर्दी आणि चित्रपटाच्या नायकाबद्दलची ओढ पाहता, आगामी काळात ‘रपाटा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली विशेष छाप सोडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
१०० मान्यवरांचा सन्मान
प्रेस मीडिया लाईव्हच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील १०० मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे ‘रपाटा’ चित्रपटाचे कलाकार आणि त्याचे प्रमोशन.
अभिनेता मोहम्मद रफीक मांगुरे यांची जादू
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण चित्रपटाचे प्रमुख अभिनेते मोहम्मद रफीक मांगुरे हे होते. त्यांचे मंचावर आगमन होताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. चित्रपटाच्या प्रमोशननंतर एक अभूतपूर्व प्रसंग पाहायला मिळाला; उपस्थित शेकडो चाहत्यांनी मांगुरे सरांचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या. आपल्या लाडक्या कलाकाराला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी चढाओढ लागली होती.
चाहत्यांच्या प्रेमाने अभिनेता भारावला
मिरज आणि आसपासच्या परिसरातून आलेल्या प्रचंड जनसमुदायाचे हे प्रेम पाहून अभिनेता मोहम्मद रफीक मांगुरे यांचे मन भरून आले. यावेळी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांगुरे सरांचा एक मोठा आणि निष्ठावान चाहता वर्ग तयार झाल्याचे पाहायला मिळाले.
‘रपाटा’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची ‘भीष्म प्रतिज्ञा’
सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी रपाटा चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर, सर्वांनी एकस्वरात ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही सर्वजण सिनेमागृहात जाऊन तो नक्की पाहू. प्रेक्षकांच्या या उदंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


























