बेडकिहाळ : शॉर्ट सर्किटने पोल्ट्री फार्मला भीषण आग; ३० हजार पिल्लांसह कोट्यवधींचे नुकसान


बेडकिहाळ : शॉर्ट सर्किटने पोल्ट्री फार्मला भीषण आग; ३० हजार पिल्लांसह कोट्यवधींचे नुकसान

बेडकिहाळ (प्रतिनिधी): बेडकिहाळ-गळतगा मार्गावरील व्यंकटेश्वरा साखर कारखान्याजवळ असलेल्या ‘रुबिया हायटेक पोल्ट्री फार्म’ला शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. या आगीत १५ दिवसांची सुमारे ३० हजार पिल्ले जळून खाक झाली असून, शेड, खाद्य आणि औषध साहित्यासह १ कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

घटनेचा थरार

बेडकिहाळ येथील ताजुद्दीन सिकंदर मुल्ला हे गेल्या १० वर्षांपासून सर्व्हे नं. १६९/१३ मध्ये हा पोल्ट्री फार्म चालवत आहेत. शुक्रवारी रात्री १२:१५ च्या सुमारास शेडवरील कामगार जेवणासाठी गावात गेले असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेडभोवती असलेली प्लास्टिक ताडपत्री आणि शेडवरील पत्रे अक्षरशः जळून खाक झाले. मालक ताजुद्दीन मुल्ला यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत आगीने संपूर्ण शेड कवेत घेतले होते.

मदतकार्य आणि अग्निशमन दलाची धाव

आग लागल्याचे समजताच व्यंकटेश्वरा साखर कारखाना आणि सदलगा येथील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की आतील ३० हजार पिल्लांचा होरपळून मृत्यू झाला.

मान्यवरांकडून पाहणी व पंचनामा

शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बीजले, सदस्य प्रमोदकुमार पाटील व अन्य मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन मुल्ला कुटुंबीयांचे सांत्वन केले.

ग्राम तलाठी एस. एन. नेम्मान्नावर आणि ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बीजले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेचा रितसर पंचनामा केला. यावेळी गळतगा येथील सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत उदगट्टी उपस्थित होते. सदलगा पोलीस स्टेशनचे जी. ए. मुजावर, सहाय्यक पी. के. कुंभार आणि आर. आर. तळवार यांनीही घटनास्थळाची पाहणी करून नोंदी घेतल्या आहेत.

या भीषण दुर्घटनेमुळे मुल्ला यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!