हजारो प्राण वाचवणारे हात का थांबले? तरुण पिढीला ‘कार्डियाक अरेस्ट’चा विळखा: एक धोक्याची घंटा
लेखक: डॉ. सलीम आळतेकर (संस्थापक: आरोग्य जागरूकता अभियान, समर्थ सोशल फाऊंडेशन)

मुंबईचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांच्या हृदयविकाराने झालेल्या आकस्मिक निधनाने एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. “हृदय वाचवणारा डॉक्टरच हृदयविकाराने गेला” ही घटना समाजाच्या मनात कायमची कोरली गेली. दुर्दैवाने, आज पुन्हा इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असल्याचे दिसत आहे.
नागपूर येथील भारतातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे अचानक कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने आयोजित एका पार्टीत ते सहभागी झाले होते. रात्री आनंद, नृत्य आणि हास्य होते — पण सकाळी अचानक हृदय थांबले. हजारो अपघातग्रस्त रुग्ण आणि स्ट्रोकग्रस्तांचे प्राण वाचवणारे हात नियतीने कायमचे थांबवले. ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची कधीही न भरून काढणारी हानी आहे.
तरुण वयातील मृत्यू : एक भयावह वास्तव
एकेकाळी हृदयविकार म्हणजे साठी नंतरचा आजार मानला जात होता. आज मात्र ३०, ३५, ४० आणि ४५ वयोगटातील तरुण, यशस्वी आणि कार्यक्षम व्यक्ती अचानक कोसळताना दिसत आहेत. विशेषतः डॉक्टर, आयटी व कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजक हे या धोक्याच्या छायेत आहेत.
हृदय अकाली का थांबते..? (मूळ कारणे)
आजचा माणूस “वेळ नाही” या एका वाक्याने स्वतःच्या आरोग्याचा बळी देतो आहे. हृदय थांबण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत:
सततचा मानसिक ताण : कामाचा डोंगर आणि जबाबदाऱ्यांचे ओझे.
अनियमित जीवनशैली : अपुरी झोप, उशिरापर्यंत जागरण आणि जेवणाच्या वेळा न पाळणे.
व्यायामाचा अभाव : तासनतास एका जागी बसून काम करणे.
चुकीचा आहार : जंक फूड, तेलकट पदार्थ आणि अति मीठ.
व्यसनाधीनता : धूम्रपान व अति मद्यसेवन हे हृदयाचे थेट शत्रू आहेत.
अतिआत्मविश्वास : “मला काय होतंय” किंवा “मी डॉक्टर आहे, मला सर्व माहित आहे” या भावनेतून स्वतःच्या तपासण्या पुढे ढकलणे.
प्रतिबंध हाच खरा उपचार : काय करावे..?
हृदयविकारावर अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, पण हृदय एकदा थांबल्यावर उपचार करण्यासाठी वेळ उरत नाही. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे:
नियमित वैद्यकीय तपासणी: पन्नाशीच्या आत असणाऱ्यांनीही दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ECG, 2D Echo, Lipid Profile आणि Blood Sugar या तपासण्या करणे गरजेचे आहे.
ताणतणाव नियंत्रण : योग, ध्यान, प्राणायाम आणि सकाळची शांत चाल — हे औषधांइतकेच प्रभावी आहेत.
शारीरिक हालचाल : दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे म्हणजे हृदयाला आयुष्यदान. आठवड्यातून किमान ५ दिवस घाम येईपर्यंत व्यायाम करा.
आहार शिस्त : जेवण करताना पोट भरायला नाही, तर हृदय वाचवायला खा. आहारात पालेभाज्या आणि फळांचा जास्तीत जास्त समावेश करा.
क्लीन्सिंग थेरपी : वर्षातून एकदा शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी क्लीन्सिंग थेरपीचा अवलंब करा.
व्यसनमुक्त जीवन : धूम्रपान आणि मद्यसेवनाला पूर्णतः पूर्णविराम द्या.
सामाजिक संकल्प
डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे जाणे आपल्याला एक कडू सत्य शिकवून जाते — यश, पैसा आणि प्रतिष्ठा असूनही आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर हृदय क्षणात थांबू शकते. त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करताना आपण एक सामाजिक संकल्प करूया: “आपण इतरांचे प्राण वाचवताना, स्वतःचे हृदय विसरणार नाही.”
कारण, थांबलेले हृदय कोणालाही दुसरी संधी देत नाही..!
तात्पर्य: आहार, विहार आणि निद्रा या गोष्टींची काळजी घ्या. मानसिक ताण कमी होईल असे व्यवहार ठेवा आणि नियमित तपासण्या करून स्वतःचे व आपल्या प्रियजनांचे हृदय सुरक्षित ठेवा.
– डॉ. सलीम आळतेकर व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती अभियान


























