ना पैशाचा माज चालणार, ना दादागिरी; प्रभाग ४० मध्ये ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’चाच डंका वाजणार!


ना पैशाचा माज चालणार, ना दादागिरी; प्रभाग ४० मध्ये ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’चाच डंका वाजणार – आमदार चेतन तुपे पाटील

पुणे (प्रतिनिधी): “हडपसर विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाय पर्याय नाही. महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रभाग क्रमांक ४० मधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा विश्वास आमदार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केला. येवलेवाडी-कोंढवा बुद्रुक प्रभाग क्रमांक ४० मधील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार गंगाधर बधे, सुरेश कवडे, वर्षा मारकड आणि सपना धर्मावत या दिग्गज उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

ठळक वैशिष्ट्ये :

विकासाची परंपरा : हडपसरच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत.

दिग्गज रिंगणात : गंगाधर बधे, सुरेश कवडे, वर्षा मारकड व सपना धर्मावत यांची भक्कम फळी.

जनतेचा कौल : अहंकार आणि दादागिरी करणाऱ्यांना मतदार घरी बसवणार.

एकजूट: ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ या दोन्ही चिन्हांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार.

अहंकार दाखवणाऱ्यांना जनता घरी बसवेल: वर्षा मारकड यावेळी बोलताना उमेदवार वर्षा मारकड म्हणाल्या की, “या प्रभागातील प्रचाराची जबाबदारी गंगाधर अण्णांनी सक्षमपणे सांभाळावी. प्रभाग ४० मध्ये विकासाची गंगा अखंड सुरू ठेवण्यासाठी चारही उमेदवारांचा विजय आवश्यक आहे. दादागिरी आणि पैशाच्या माजाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच थारा देणार नाही. राजकारणात अहंकार दाखवणाऱ्यांना जनता या निवडणुकीत निश्चितच घरी बसवेल.”

विकासाच्या जोरावर विजयाचा निर्धार आमदार चेतन तुपे यांनी पुढे नमूद केले की, “आम्ही केलेल्या विकासकामांची पावती जनता मतपेटीतून देईल. प्रभाग ४० मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, या प्रभागातून घड्याळ आणि तुतारीचाच डंका वाजेल आणि चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील.”

यावेळी प्रभागातील नागरिक, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!