नक्कल करणाऱ्यांची ‘अक्कल’ ठिकाणावर! ३१ शाळांना ‘नारळ’ आणि ७६ केंद्रांना ‘रामराम’; बोर्डाचे सर्जिकल स्ट्राईक!


नक्कल करणाऱ्यांची ‘अक्कल’ ठिकाणावर.! ३१ शाळांना ‘नारळ’ आणि ७६ केंद्रांना ‘रामराम’; बोर्डाचे सर्जिकल स्ट्राईक!

अखेर व्हायचं तेच झालं! विद्येच्या मंदिरात बसून ‘चोऱ्यामाऱ्या’ करणाऱ्यांना वाटलं होतं की, बोर्डाचे डोळे बांधलेले आहेत. पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने असा काही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे की, कॉपीबहाद्दरांचे पार धाबे दणाणले आहेत! अहो, परीक्षेच्या नावाखाली ज्या केंद्रांनी ‘नक्कल बाजारा’ची दुकाने मांडली होती, त्या १०७ दुकानांना आता मंडळाने कायमचे कुलूप ठोकले आहे!

संभाजीनगरचा ‘विक्रमी’ पराक्रम..!

या कारवाईत आमचा ‘छत्रपती संभाजीनगर’ विभाग तर सगळ्यात पुढे निघाला! जणू काही कॉपी करण्याचा ‘सुवर्णपदक’ मिळवण्याचा विडाच तिथल्या ३८ केंद्रांनी (१० वीची १० आणि १२ वीची २८) उचलला होता. अहो, सरस्वतीच्या पूजनाऐवजी तिथे ‘कागदाच्या कपट्यांचे’ भजन चालले होते की काय? आता बोर्डाने या केंद्रांना असा काही ‘रामराम’ ठोकलाय की, पुन्हा तिथे परीक्षेचा कागद हलण्याची सोय उरली नाही!

भरारी पथकांचा ‘रुद्रवतार‘ गेल्या वर्षीच बोर्डाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी बजावले होते की, “सुधारा, नाहीतर संपा!” पण ‘खाई त्याला खवखवे’ या न्यायाने ज्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांच्या मानगुटीवर आता कारवाईचं भूत बसलंय. ड्रोन, सीसीटीव्ही आणि पोलिसांचा वेढा पाहून वाटतंय की ही परीक्षा आहे की सीमेवरचं युद्ध? पण जिथे अक्कल गहाण ठेवून नक्कल केली जाते, तिथे असे ‘अघोरी’ उपाय योजावेच लागतात.

विभागीय ‘कौतुक सोहळा’:

पुणे आणि लातूर : शिक्षणाचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात १९ तर लातूर पॅटर्नच्या बालेकिल्ल्यात १५ केंद्रांना ‘नारळ’ मिळाला आहे.

कोकण आणि कोल्हापूर : शाबास! या दोन विभागांनी मात्र आपला स्वाभिमान जपला आहे. तिथे ना कसली कारवाई, ना कसला गैरप्रकार. इथल्या मातीने किमान ‘प्रामाणिकपणा’ टिकवून ठेवलाय, हे पाहून छाती अभिमानाने फुलून येते!

आमचा ‘मराठमोळा’ सवाल : अहो डॉक्टर कुलकर्णी, ही तर फक्त केंद्रांवरची कारवाई झाली! पण या ‘कॉपी-कारखान्यांचे’ मालक असलेल्या संस्थाचालकांचे काय? ज्यांनी विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या पुरवायला मूक संमती दिली, त्यांच्या मुसक्या कधी आवळणार? केवळ केंद्राची मान्यता रद्द करून भागणार नाही, तर शिक्षणाचा बाजार करणाऱ्या अशा ‘पांढरपेशा’ दलालांना चव्हाट्यावर आणून त्यांचे जाहीर वाभाडे काढले पाहिजेत!

थोडक्यात काय, तर ज्यांनी अक्कल गहाण ठेवून नक्कल केली, त्यांची आता बोर्डाने ‘अद्दल’ घडवून चांगलीच खोड मोडली आहे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!