अग्रलेख: जिभेची घसरगुंडी अन् संसाराची बाराखडी..!
“बाई बाई बाई… अहो वाहिनी, काय सांगू तुम्हाला? अलीकडे आमच्या ह्यांची बोलताना सतत जीभ घसरू लागली हाय, पार वैताग आलाय बघा!”—एका कोपऱ्यावरच्या या घरगुती संवादातून आजच्या काळातील एका मोठ्या रोगाचं दर्शन घडतंय. माणूस निसर्गाचा चमत्कार हाय असं म्हणतात, पण जेव्हा त्याची ‘जीभ घसरते’, तेव्हा हा चमत्कार हाय की एखादा ‘तांत्रिक बिघाड’, याचा पंचनामा करण्याची वेळ येते. पावसाळ्यात रानातली वाट निसरडी झाली की पाय घसरतो, हे आपल्या ध्यानात येतंय; पण जेव्हा अहंकार आणि रागाची मस्ती शब्दांना तेल लावते, तेव्हा जिभेची जी काही ‘घसरगुंडी’ होते, ती पाहणं म्हणजे एक नंबरचं मनोरंजन असतंय.
आजच्या काळात एक गोष्ट काळजावर कोरून ठेवावी अशी हाय, ती म्हणजे— एक वेळ पाय घसरला तरी चालेल, पण जीभ घसरता कामा नये! पाय घसरला तर माणूस चिखलात पडंल, लय तर एखादं हाड मोडल; पण जीभ घसरली की समोरच्याचं मन मोडतंय अन् बोलणाऱ्याचं चारित्र्यच चिखलात माखलं जातंय. मोडलेलं हाड दवाखान्यात जोडलं जातंय, पण निसटलेल्या शब्दांनी झालेली जखम काळजाला कायमची भगदाडं पाडतेय.
आजकाल हे ‘जीभ घसरण्याचं’ सुद्धा एक मार्केट तयार झालंय. राजकारण्यांची जीभ घसरली की त्याची तातडीनं ‘ब्रेकिंग न्यूज’ होते, दिवसभर टीव्हीवर त्याचेच राडे सुरू असतात; पण आमच्यासारख्या सर्वसामान्यांची जीभ जर का चुकून बिघडली, तर गल्लीभर चर्चा होते! राजकारण्यांना चॅनेलवाले सावरतात, पण सर्वसामान्यांना मात्र गल्लीतले लोक ‘धुतात’. संसारात जर सतत जीभ घसरू लागली, तर त्या संसाराचे ‘बारा’ वाजायला फार वेळ लागत नाही. संताप चढला की मेंदूचा ताबा जणू ही साडेतीन इंची जीभ घेतेय आणि मग जे काही ‘रामायण-महाभारत’ घडतंय, त्यातून सावरताना अख्खी हयात खर्ची पडतेय.
विशेषतः राजकारणात तर जिभेचा वापर हा एका दुधारी तलवारीसारखा झालाय. ही तलवार जशी जनमत घडवू शकतेय, तशीच ती स्वतःच्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकतेय. आजकाल राजकारणात “बोले तैसा चाले” हे सूत्र दिवट्या लावून शोधलं तरी सापडत नाही, उलट “बोले तो जिंकले” याच तत्त्वावर सगळे घोडे नाचवले जातायत. पण अभ्यासक सांगतात त्याप्रमाणे, जिभेवर ताबा ठेवून योग्य वेळी योग्य भाषेचा वापर करणारा नेताच राजकारणाच्या आखाड्यात दीर्घकाळ तग धरू शकतोय. ज्याला स्वतःचे शब्द सावरता येत नाहीत, तो राज्याचा कारभार काय खाक सावरणार?
या ‘घसरगुंडी’ पुराणाचा शेवटचा अंक तर लय गमतीशीर असतोय. एका पठ्ठ्याची जीभ घसरली आणि तो आपल्या कडक सासूबाईंना चुकून ‘सासू’ म्हणण्याऐजी ‘सासू-सुनामी’ बोलून गेला. आता सासूबाईंचा राग तो! त्यांनी जो काही तांडव केला, त्यानंतर तो पठ्ठा आता घरात बोलताना जिभेला ‘डबल साईड टेप’ लावून फिरतोय. दुसऱ्या एका बहाद्दराने ऑफिसमध्ये बॉसच्या टकलाकडे बघून “काय चांदणं पडलंय” अशी जीभ घसरवली, तो आता घरी बसून स्वतःच्या जिभेला ‘अँटी-स्किड’ ऑईल लावत बसलाय.
थोडक्यात काय तर, ज्यांची जीभ वारंवार घसरतेय, त्यांनी खुशाल समजून घ्यावं की त्यांच्या वैचारिक गाडीचे ब्रेक फेल झालेत. बोलण्यापूर्वी किमान दोन क्षण विचार करण्याची सवय लावली नाही, तर ही घसरलेली जीभ तुम्हाला लोकांच्या नजरेतून अशी काही खाली पाडंल की, पुन्हा वर येताना तुम्हाला शब्दांची शिडी सुद्धा पुरणार नाही! शेवटी काय, तोंडातली जीभ ताळ्यावर असेल, तरच आयुष्याचा ताळा बसेल, नाहीतर संसाराचे ‘बारा’ वाजलेच म्हणून समजा!





















