बेडकिहाळात माणुसकीचा महाकुंभ..! शिंगाडे ट्रस्टने बांधली जातीपातीच्या पलीकडची ‘लग्नगाठ’; शिव-भीम-बसव विचारांचा जागर..!


बेडकिहाळात माणुसकीचा महाकुंभ..! शिंगाडे ट्रस्टने बांधली जातीपातीच्या पलीकडची ‘लग्नगाठ’; शिव-भीम-बसव विचारांचा जागर..!

बेडकिहाळ : अहो, जगात सध्या स्वार्थाचा बाजार मांडला असताना माणुसकीची ऊब देणारी माणसं सापडणं दुर्मिळ झालंय! पण बेडकिहाळच्या मातीत कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टने समाजसेवेचा असा काही ‘महाकुंभ’ भरवला की, पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं! निमित्त होतं शिवराय, भीमराय आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचं, पण या निमित्तानं पेटली ती सामाजिक परिवर्तनाची मशाल!

क्रांतीची नवी लग्नगाठ..!

डॉ. विक्रम शिंगाडे या तरुण तडफदार नेतृत्वाखाली आयोजित या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात चार जोडप्यांनी संसाराची नवी स्वप्नं पाहिली. केवळ लग्न लावून देणं हा यामागचा हेतू नव्हता, तर जातीपातीच्या भिंती पाडून ‘माणूस’ म्हणून एकत्र येण्याचा हा एक बुलंद हुंकार होता. मंगळसूत्र, जोडवी, शालू आणि संसार संच देऊन जेव्हा वधू-वरांचे कन्यादान झाले, तेव्हा हजारो जनसमुदायाचा आशीर्वाद या जोडप्यांच्या पाठीशी उभा राहिला.

विद्वत्ता आणि कर्तृत्वाचा संगम

कार्यक्रमाचे उद्घाटन मिरजचे सुप्रसिद्ध ब्रेन स्पेशालिस्ट डॉ. विक्रमसिंह जाधव आणि डॉ. शर्वरी जाधव यांच्या हस्ते पार पडले. “डॉ. विक्रम शिंगाडे यांचं कार्य म्हणजे समाजासाठी एक प्रेरणा आहे,” अशा शब्दांत डॉ. जाधवांनी शिंगाडेंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, जिथे उद्योजक अशोक जंगम, अशोक नरुटे, डॉ. प्रकाश कदम आणि डॉ. युयुत्सु आर्ते यांसारख्या दिग्गजांनी अभिवादन केले.

केवळ लग्न नव्हे, तर ज्ञानाचाही सन्मान..!

ज्या हातांत उद्याचं भविष्य आहे, त्या हातांना बळ देण्याचं कामही या सोहळ्यात झालं. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंतांना शालेय साहित्य आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. शिंगाडे ट्रस्ट फक्त लग्नापुरती मर्यादित नाही, तर रक्तदान शिबिरं, गरजूंची शालेय फी भरणं आणि अनाथ आश्रमांना आधार देणं, अशा नानाविध कामांतून ही संस्था माणुसकीची मशागत करत आहे, अशी पावतीच जणू मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिली.

आशीर्वादाचा पाऊस…!

प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की, “आज फक्त चार जोडप्यांचे विवाह होत नसून, पाच लाख लोकांचे आशीर्वाद या ट्रस्टला मिळत आहेत.” शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब केस्ते यांनीही डॉ. शिंगाडेंचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम ठोकला.

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह फुलून गेलं होतं ते केवळ गर्दीने नाही, तर त्या पवित्र भावनेने! ॲड. सुधाकर माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा म्हणजे निव्वळ कार्यक्रम नव्हता, तर तो होता माणुसकीचा उत्सव आणि परिवर्तनाचा नवा अध्याय!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!