नवी मुंबई पालिकेत भ्रष्टाचाराचा ‘नंगा नाच’; अतिक्रमण विभागाचे गायकवाड लाचेच्या घासलेखात रंगेहात चितपट..!

सुनील पाटील
नवी मुंबई : ज्यांच्या नावातच ‘कैलास’ आहे, ते साहेब इतक्या खालच्या थराला जाऊन लाचेचा घास घेतील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते! नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांनी काल पालिकेच्या मुख्यालयात भ्रष्टाचाराचा असा काही बाजार मांडला की, साक्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तिथे धाव घ्यावी लागली. अवघ्या ४२ हजार रुपयांसाठी साहेबांनी आपल्या इभ्रतीचा असा काही लिलाव केलाय की, आता संपूर्ण नवी मुंबईत त्याचीच चव चर्चिली जात आहे!
‘सही’साठी हवी होती ‘मिठाई’!
कंत्राटदार दशरथ सुरवते यांनी ऐरोलीत अतिक्रमण हटवण्यासाठी आपली माणसे राबवली, घाम गाळला. पण साहेबांची ‘सही’ म्हणजे काय साधीसुधी गोष्ट आहे का? जोपर्यंत लक्ष्मीचे दर्शन घडत नाही, तोपर्यंत साहेबांच्या लेखणीला शाई फुटत नाही! तीन महिन्यांच्या मेहनतीचे बिल मंजूर करण्यासाठी गायकवाड साहेबांना ४२ हजार रुपयांची ‘चिरीमिरी’ हवी होती. कंत्राटदाराला वाटले असेल, “साहेब आहेत की सावकार?” शेवटी नाईलाजास्तव त्यांनी या लाचखोर वृत्तीला अद्दल घडवण्याचे ठरवले आणि साहेबांच्या ‘साहेबी’वरच कायद्याचा बुलडोझर फिरवला!
केबीन मध्येच झाला ‘खेळ’!
काल सकाळी साहेब आपल्या एसी केबीनमध्ये बसून कदाचित पुढच्या कोणत्या कमाईचे नियोजन करत असावेत. इतक्यात कंत्राटदार आले, त्यांनी ४२ हजारांची दक्षिणा साहेबांच्या चरणी अर्पण केली. साहेबांनी मोठ्या प्रेमाने ती स्वीकारली आणि… ‘खल्लास’! दबा धरून बसलेल्या पथकाने साहेबांना असे काही पकडले की, साहेबांच्या चेहऱ्यावरचा रंग एखाद्या जुन्या झालेल्या भिंतीसारखा उडाला. तिसऱ्या मजल्यावरच्या त्या आलिशान दालनातून जेव्हा साहेबांना पकडून नेले, तेव्हा इतर अधिकाऱ्यांच्या काळजात इतकी धडधड झाली की पालिकेची इमारत हादरली असेल!
कचरा नक्की कुठे?
गायकवाड साहेब दिवसभर लोकांची अनधिकृत बांधकामे पाडत फिरत असत. पण काल त्यांच्याच इभ्रतीचे जे काही ‘बाकीचे बांधकाम’ उध्वस्त झाले आहे, ते आता पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही. पालिकेत सध्या एकच कुजबुज सुरू आहे— “साहेबांनी आधी किती जणांना ओरबाडले असेल?” पण आता साहेबांना सरकारी कोठडीतल्या भिंती मोजण्याशिवाय दुसरे कोणतेही काम उरलेले नाही.
थोडक्यात काय तर… ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर थेट तुरुंगात उपाशी’ अशी अवस्था सध्या गायकवाड साहेबांची झाली आहे!
























