जनतेच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस झिजणाऱ्या लेखणीचा सन्मान ; पुण्यात युनूस खतीब यांचा ‘ग्रिफिन’ देऊन शाही सत्कार.!

पुणे | ज्या पुण्याच्या मातीने टिळक-आगरकरांच्या लेखणीचे तेज अनुभवले, त्याच पुण्यात काल एका सच्च्या पत्रकाराच्या इमानाचा बुलंद विजय झाला! सामान्य माणसाच्या डोळ्यांतील अश्रूंना वाचा फोडणाऱ्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या युनूस खतीब या झुंजार पत्रकाराला २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘ग्रिफिन पुरस्कार’ बहाल करण्यात आला. हा सोहळा म्हणजे केवळ एक कौतुक सोहळा नव्हता, तर ती सत्याची आणि धगधगत्या पत्रकारितेची पुण्याच्या दरबारात झालेली सिंहगर्जना होती!
पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सभागृह काल अशाच एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. कम्युनिटी कनेक्ट आणि लोकशाहीसाठी ‘PAG’ या संस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात युनूस खतीब यांचा गौरव झाला. या कार्यक्रमाला पत्रकारिता क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व उज्ज्वला बर्वे डोके, लोकशाही मूल्यांचे रक्षक नीरज जैन आणि ॲड. अय्युब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिग्गजांच्या हस्ते जेव्हा खतीब यांना सन्मानित करण्यात आले, तेव्हा उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने हेच अधोरेखित केले की, आजच्या काळातही जो पत्रकार झुकत नाही आणि विकला जात नाही, त्याला जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही.
या दैदिप्यमान सोहळ्याचे सारथ्य पुण्याचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नवनीत सिंग गांधी आणि मुंबईचे अली भोजानी यांनी केले. विशेषतः नवनीत सिंग गांधी यांनी ज्या आत्मीयतेने आणि चिकाटीने या कार्यक्रमाचे नियोजन केले, त्यामुळेच या पुरस्काराची उंची अधिकच वाढली. या सोहळ्यात खतीब यांच्यासोबतच पत्रकारितेच्या मैदानात निधड्या छातीने वावरणाऱ्या ओमकार वाबळे, प्राची कुलकर्णी, मुक्ता कदम, अश्विनी सातव डोके, प्रतीक्षा जोशी आणि कॅथरिन अब्राहम या शिलेदारांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना युनूस खतीब यांनी ठणकावून सांगितले की, हा सन्मान माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या प्रत्येक सामान्य माणसाचा आहे, ज्याचे दुःख मी माझ्या लेखणीतून मांडतो. जोपर्यंत समाजात अन्याय जिवंत आहे, तोपर्यंत माझी लेखणी शांत बसणार नाही, असा वज्रनिर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या काळवंडलेल्या वातावरणात युनूस खतीब यांच्यासारखा हिरा जेव्हा चमकतो, तेव्हा लोकशाहीचा खांब अजूनही मजबूत असल्याची खात्री पटते. खतीब, तुमची ही लेखणी अशीच अन्यायावर तुटून पडो, हीच समस्त पुणेकरांची सदिच्छा!



























