विशेष लेख : दहावी नापास, मुंबईची वारी अन् ड्रग्जची पंढरी; साडेसात कोटींच्या गोळ्यांनी तरुण पिढीची राखरांगोळी !
शिक्षणाने शहाणे व्हायचे सोडून जेव्हा आयुष्याच्या वाटा विनाशाच्या गर्तेत हरवतात, तेव्हा काय होते याचे जळजळीत आणि काळजाला घरघर लावणारे उदाहरण म्हणजे पुण्याची ‘अश्विनी’! दहावीच्या परीक्षेत हुकलेली संधी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी २०१२ मध्ये धरलेली मुंबईची वाट, तिला थेट ‘मृत्यूची सौदागर’ बनवेल असे तिच्या जन्मदात्यांना स्वप्नातही वाटले नसेल. बारमध्ये काम करता करता ती कधी काळोख्या जगाची ‘राणी’ झाली आणि साडेसात कोटींच्या ड्रग्जसह पकडली गेली, हा प्रवास ऐकून आज कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही.
तुरुंगातील ‘नातं’ अन् नियतीची ‘कुस्ती’
या भीषण कथेचा सूत्रधार इरफान अन्सारी नावाचा एक अट्टल गुन्हेगार आहे. ज्याचे हात आधीच अनेक लेकरांच्या आयुष्याशी खेळून बरबटलेले होते, अशा अन्सारीची गाठ अश्विनीशी चक्क तुरुंगात पडली. एका सहकाऱ्याला भेटायला गेलेल्या अश्विनीच्या गरिबीचा आणि मजबुरीचा गैरफायदा अन्सारीने घेतला. जास्तीच्या पैशांचे प्रलोभन दाखवून त्याने या मुलीला अशा दलदलीत ओढले, जिथून परतण्याचा रस्ताच उरला नव्हता. हायटेक तस्करांप्रमाणे ती केवळ ‘व्हीओआयपी’ कॉलवर बोलायची, इंटरनेटच्या पडद्याआड लपून पोलिसांना चकवा देऊ पाहायची; पण अखेर कायद्याच्या हातांनी तिला टिटवाळ्याच्या घरातून ओढून काढले, जिथे ५ किलो मृत्यूचा साठा दडलेला होता.
आई-वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी
सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, या दीड-दोन हजारांच्या गोळ्यांचे मुख्य ‘शिकार’ कोण होते? तर कॉलेजमध्ये जाणारी आमची कोवळी मुलं! ज्या मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असायला हवे, त्यांच्या खिशात ही विषारी गोळी पोहोचवण्याचे पातक या टोळीने केले. पैशांच्या हव्यासापोटी अश्विनीने किती घरांचे दिवे विझवले असतील आणि किती माता-पित्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने धुळीला मिळवली असतील, याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो.
तरुणांनो, त्या माऊलीच्या डोळ्यांतील पाणी तरी पहा!
आजच्या तरुण पिढीला ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या माध्यमातून काळजाला भिडणारा एकच सवाल विचारावासा वाटतो—क्षणभराच्या नशेत स्वतःच्या आयुष्याचा जुगार खेळताना तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा चेहरा का दिसत नाही? ज्या माऊलीने नऊ महिने नऊ दिवस स्वतःच्या रक्तात तुम्हाला वाढवले, ज्या बापाने रक्ताचे पाणी करून, स्वतःच्या इच्छा मारून तुम्हाला लहानाचे मोठे केले, त्यांच्या कष्टाचे हेच का ते मोल?
ज्या हातांनी म्हातारपणी आई-वडिलांना घास भरवायचा, त्यांना आधार द्यायचा, ते हात जर ड्रग्जच्या गोळ्यांनी थरथरू लागले, तर त्यांच्या काळजाला किती जखमा होत असतील याचा एकदा तरी शांतपणे विचार करा. ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवले, त्यांना म्हातारपणी रस्त्यावर आणू नका. व्यसनाच्या या नशिल्या पंढरीतून बाहेर पडा आणि ज्यांनी तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्या म्हातारपणाची सावली व्हा.
अश्विनी आणि अन्सारी आज गजाआड आहेत, पण त्यांनी समाजाच्या काळजावर दिलेली जखम मोठी आहे. तरुणांनो, या विनाशाच्या वाटेवरून मागे फिरा. लक्षात ठेवा, तुमची एक ‘चूक’ केवळ तुमचे आयुष्य संपवत नाही, तर तुमच्यासाठी जगणाऱ्या तुमच्या आई-वडिलांना जिवंतपणी मरणाच्या दारात लोटते. त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू येऊ द्या, निराशेचे नको!


























