अहो नवलच ! एसटीचे तिकीट महागले, आता दोन रुपयांत मिळणार ‘मोक्ष’ आणि ‘मोफत’ प्रसाधनगृह !


अहो नवलच ! एसटीचे तिकीट महागले, आता दोन रुपयांत मिळणार ‘मोक्ष’ आणि ‘मोफत’ प्रसाधनगृह !

नमस्कार…

अहो, आमच्या लाडक्या ‘लालपरी’ने काय किमया केली आहे पहा! १५ एप्रिलपासून एसटीने प्रवाशांच्या खिशाला असा काही ‘स्वच्छ’ कात्री लावायचा निर्णय घेतला आहे की विचारता सोय नाही. तिकीटाच्या दराव्यतिरिक्त आता प्रत्येक प्रवाशाला जादा दोन रुपये मोजावे लागणार आहेत. नाव काय तर म्हणे— ‘स्वच्छता अधिभार!’

काय हे आमचे महामंडळ ! गणिताचे मास्तर म्हणतील, दोन रुपये म्हणजे काय? आजच्या काळात दोन रुपयांत साधा फुटाणा सुद्धा येत नाही. पण इथेच तर महामंडळाचा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे ! दिवसाला ५५ लाख प्रवासी आणि प्रत्येकाकडून दोन रुपये गोळा केले की दिवसाला तब्बल १ कोटी १० लाख रुपये जमा होणार! म्हणजे महिन्याकाठी ३० कोटी! वा! एसटीच्या रिकाम्या तिजोरीत आता पैशांचा असा काही खणखणाट होईल की, तो ऐकून कुबेराला सुद्धा स्वतःच्या श्रीमंतीची लाज वाटेल!

बरं, या दोन रुपयांच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार? तर म्हणे, ‘राज्यातील एसटी स्टँडवरची प्रसाधनगृहे आता मोफत!’ म्हणजे प्रवाशाने १० किलोमीटरचा प्रवास करावा की १००, त्याने तिकीट काढलं की त्याला त्या ‘पवित्र’ जागेत प्रवेश मिळवण्याचा परवानाच मिळाला समजा. म्हणजे बघा, प्रवास करा किंवा न करा, पण महामंडळाच्या स्वच्छतेसाठी तुमचा दोन रुपयांचा वाटा हा ‘कायमस्वरूपी’ असणार! ही दूरदृष्टी पाहून  प्रवासी सुद्धा थक्क होतील.

बिचारा ग्रामीण भागातला शेतकरी, नोकरदार आणि विद्यार्थी! आधीच एसटीचे टायर झिजलेले, सीट फाटलेली आणि इंजिन खोकणारं. आता त्यात या दोन रुपयांची भर. “देवाला नारळ फोडायला 30 रुपये लागतात आणि एसटीच्या स्वच्छतेसाठी दोन !” अशी भावना प्रवाशांची झाली आहे. आता बसस्थानकावर गेल्यावर प्रवाशांना दोनच गोष्टींचे कुतूहल असेल— बस वेळेवर येईल का? आणि जर नाही आली, तर त्या दोन रुपयांच्या बदल्यात मिळणारी ही ‘मोफत सेवा’ खरोखर ‘स्वच्छ’ असेल का?

महाराज, एसटी हे गरिबांचे विमान आहे. आता या विमानाला ‘स्वच्छतेचे पंख’ फुटणार असतील तर उत्तमच आहे. पण या जमा होणाऱ्या ३० कोटींतून स्थानके खरंच चकाचक होणार की हा निधी सुद्धा एसटीच्या जुन्या खड्ड्यातच मुरणार, हे काळच ठरवेल. सध्या तरी प्रवाशांची अवस्था “खिशात नाही आणा, आणि एसटी म्हणते दोन रुपये द्या ना!” अशी झाली आहे. तरीही, दोन रुपयांत ‘निर्मल’ प्रवासाचे स्वप्न दाखवणाऱ्या महामंडळाच्या या अजब कल्पकतेला आमचा मानाचा मुजरा!

— आपलाच, प्रेस मीडिया लाईव्ह !


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!