येरवड्याच्या वेड्यांच्या इस्पितळात शहाण्यांचा ‘भ्रष्ट’ बाजार !


श्रमिकांच्या घामाची चोरी करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध ‘आप’चे रणशिंग..!

पुणे : येरवड्यातील त्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भिंतींनाही कदाचित आता पाझर फुटेल, पण इथल्या पाषाणहृदयी प्रशासनाला आणि भ्रष्ट ठेकेदारांना मात्र कामगारांच्या अश्रूंची किंमत उरलेली नाही. ज्या हातांनी कचरा उचलून हे रुग्णालय स्वच्छ ठेवले, त्याच हातांना आज आपल्या हक्काच्या वेतनासाठी उपोषणाची वेळ आली आहे. या अमानुष शोषणाविरोधात आणि भ्रष्ट कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात आम आदमी पार्टी कामगार आघाडीच्या वतीने आज दुपारी ३ वाजल्यापासून मनोरुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे.

“भ्रष्ट सफाई ठेकेदारांना काळ्या यादीतून कोण वाचवतोय?” हा प्रश्न आता पुण्याच्या सार्वजनिक जीवनातील एक जळजळीत कोडे बनला आहे. कामगारांचे वेतन थकवून स्वतःच्या उखळ पांढरे करणाऱ्या या ठेकेदारांना प्रशासनातील कोणत्या बड्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त लाभले आहेत, याचा जाब आता विचारला जाणार आहे. कंत्राटी कामगार म्हणजे जणू काही गुलामांची फौजच आहे, अशा थाटात वागणाऱ्या या मक्तेदारांना आता चव्हाट्यावर आणण्याची वेळ आली आहे.

जोपर्यंत या भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जात नाही आणि पिडित कामगारांच्या बँक खात्यात त्यांच्या घामाचा शेवटचा रुपया जमा होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा संजय कोने यांनी दिला आहे. आज दुपारी ३ वाजता येरवडा मनोरुग्णालयाच्या वेशीवर घुमणारा हा आवाज म्हणजे केवळ कामगारांची ओरड नसून, ती भ्रष्ट व्यवस्थेच्या छाताडावर मारलेली एक जबरदस्त लाथ आहे! आता तरी या निगरगट्ट प्रशासनाला जाग येते की ते या शोषणाचे उघड्या डोळ्यांनी दर्शन घेत राहते, हेच पाहायचे!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!