अग्रलेख: महाराष्ट्राचा ‘बॅंडेज’ पॅटर्न : कानात कापूस, डोळ्याला झंडू बाम आणि डोक्याला नवरत्न तेल..!
वाचक मित्रांनो, नमस्कार…
आजच्या आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली की असं वाटतं, सामान्य माणसाने जगायचं कसं याचा एखादा ‘डिप्लोमा’च आता पूर्ण करायला हवा. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या वाट्याला जे काही येतंय, ते एखाद्या चित्रपटाच्या पटकथे पेक्षा कमी नाही.
एकीकडे निसर्गाचा कोप होतोय, अवकाळीचा दणका बसतोय, तर दुसरीकडे विज्ञानाच्या युगातही बुवाबाजीचा बाजार तेजीत आहे. एसआयआर (SIR) आणि मॅपिंगसारखे जड शब्द हवेत तरंगत आहेत, पण सर्वसामान्यांच्या घराचं मॅपिंग नेमकं कुठं बिघडलंय, हे पाहायला कोणालाच वेळ नाही. या एसआयआर मॅपिंगच्या तांत्रिक जंजाळामुळे तर शिक्षकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आधीच शैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांना आता ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करावा लागतोय. ज्या शिक्षकांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा (BP) त्रास आहे, त्यांची अवस्था तर या धावपळीत आणि मानसिक तणावात अधिकच बिकट झाली आहे. राज्याची ही विचित्र अवस्था पाहून आता तर असं वाटतंय की, महाराष्ट्र नेमका कोणत्या ग्रहांच्या विळख्यात सापडला आहे, हे मोठ्या मोठ्या ज्योतिषांना सुद्धा कळेनासं झालंय!
राजकारणाची परिस्थिती तर विचारूच नका. आजचे राजकारण म्हणजे जनहित साधण्याचे साधन न राहता केवळ ‘आरोपांचा आखाडा’ झाला आहे. टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या की डोक्याला ‘झंडू बाम’ लावावा लागतो. तेच ते चेहरे, तेच ते एकमेकांचे वाभाडे काढण्याचे कार्यक्रम आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी! या आखाड्यात नेते एकमेकांना धोबीपछाड देण्यात इतके दंग आहेत की, प्रेक्षक म्हणून बसलेल्या जनतेच्या घामाची त्यांना फिकीरच उरलेली नाही. घराबाहेर हा राजकीय राडा सुरू असताना घरात महागाईमुळे होणारी कटकट आणि वटवट यामुळे सर्वसामान्यांचं जगणं हैराण झालं आहे.
महागाईचा भडका तर असा उडालाय की, एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत पाहिली की गरिबाच्या डोळ्यासमोर अंधारी येते. गॅस बुक करूनही तो वेळेवर घरपोच मिळत नाही आणि स्वतः आणायला गेलं, तर तिथेही ‘वरचे’ २५ रुपये जास्त मोजावे लागत आहेत. एवढंच काय, आता तर साध्या हेअर कटिंग सलूनमध्ये गेलं तरी महागाईचा फटका बसतोय. डोक्यावर केस जास्त असो वा कमी, कटिंगचा फिक्स दर १०० रुपये झाला आहे! म्हणजे महागाईने डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत कोणालाच सोडलेलं नाही.
या सगळ्या जाचाला कंटाळून एखाद्याने संन्यास घ्यावा म्हटलं, तरी तिथेही ‘जीएसटी’ आडवा येतोच! म्हणजे सुटका कुठेच नाही. या राजकीय गोंधळात आणि महागाईच्या रेट्यात सामान्य नागरिक इतका पिचला गेलाय की, आता त्याने स्वतःला वाचवण्याचा एक अजब मार्ग शोधला आहे. आजची जनता दिवसा कष्टाने आणि तणावाने थकून जातेय, आणि रात्री मग डोक्यावर पट्टी बांधून, कानात कापूस घालून, डोक्याला ‘थंडा थंडा कूल कूल’ तेल लावून जगाला विसरण्याचा प्रयत्न करतेय.
या प्रचंड तणावामुळे कुणाचे ‘अच्छे दिन’ आले की नाही माहीत नाही, पण देशी दारूच्या गुत्त्यांवर मात्र गर्दी वाढताना दिसतेय. कारण साहेब, आजच्या या महागाईच्या परिस्थितीत सामान्यांना ‘विदेशी’ परवडत नाही, म्हणून मग ‘देशी’चाच आधार घ्यावा लागतोय, हीच आजच्या काळाची मोठी शोकांतिका आहे.
थोडक्यात सांगायचं तर, धनदांडगे लोक सुखाच्या शिखरावर आहेत आणि गरीब जनता मात्र सुपात पडलेल्या दाण्यांसारखी पाखडली जात आहे. तणाव इतका वाढलाय की, उद्याचा दिवस तरी सुखाचा असेल का, या एकाच आशेवर सध्या सर्वसामान्यांचा दिवस ढकलला जात आहे.
पण वाचकहो, कितीही संकटं आली आणि राजकीय आखाड्यात धुळवड सुरू राहिली तरी, संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहणं हीच तर आपल्या मातीची शिकवण आहे. आज महागाईचा चटका असेल, उद्या कदाचित आनंदाची लाटही येईल. राजकारणी एकमेकांचे वाभाडे काढत राहतील, पण आपण मात्र आपल्यातला माणुसकीचा जिव्हाळा जपला पाहिजे. तणावाच्या या वातावरणातही एकमेकांना साथ दिली, तर डोक्यावरची ही चिंतेची पट्टी नक्कीच निघून जाईल. शेवटी, ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल’ या उक्तीप्रमाणे, आजच्या या अंधारातून उद्याचा सुखाचा आणि समृद्ध महाराष्ट्राचा सूर्य नक्कीच प्रकाशमान होईल, यात शंका नाही!
नमस्कार उद्या परत भेटू एक नवीन विषय घेऊन..!



























