जनता उन्हातान्हात होरपळतेय आणि IRB चे अधिकारी आडमुठेपणाचे डोस पाजतायत ; या ‘पांढऱ्या हत्तींना’ आवर घालणार कोण?


जनता उन्हातान्हात होरपळतेय आणि IRB चे अधिकारी आडमुठेपणाचे डोस पाजतायत ; या ‘पांढऱ्या हत्तींना’ आवर घालणार कोण..?

 

 

– सुनील पाटील 

मुंबई-पुणे जुना महामार्ग (NH48):

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर सध्या ‘आयआरबी’ (IRB) कंपनीच्या कर्तव्यदक्षतेचा असा काही बनावट पूर आला आहे की, त्यात सामान्य जनतेचे हाल पाहून संताप अनावर व्हावा! ही महाशय मंडळी सध्या जेसीबी आणि लवाजमा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असलेले होर्डिंग-बॅनर जमीनदोस्त करण्यात गुंग आहेत. परंतु, या मोहिमेचा जो तमाशा सुरू आहे, त्यामुळे खोपोलीपासून ते शेडुंग, बोरले आणि पनवेलपर्यंतच्या प्रवाशांना भर उन्हात ज्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत, त्याला जबाबदार कोण?

झोपलेले कुंभकर्ण आता जागे झाले..!

आज हे अधिकारी कोणत्या तरी अघोरी उत्साहाने बोर्ड पाडत आहेत. पण जेव्हा हे लोखंडी अक्राळविक्राळ सांगाडे उभे राहात होते, तेव्हा हे आयआरबीचे ‘विजिट अधिकारी’ कुणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते? महिन्याकाठी पगार पदरात पाडून घेणारे हे अधिकारी तेव्हा आंधळे झाले होते का? की त्या लोखंडी खांबांच्या सावलीत बसून ‘चिरीमिरी’ची चव चाखत होते? आज पन्नास-साठ हजारांचे, लाखो रुपयांचे साहित्य मातीमोल होत आहे. जर हे बेकायदेशीर होते, तर सुरुवातीलाच त्यांना पायबंद का घातला नाही?

टोलसाठी हात पुढे , पण सेवेच्या नावाने ठणाणा.!

शेडुंगला टोल नाका लावून लोकांच्या खिशात हात घालायला ही कंपनी तत्पर आहे. पण रस्त्याची गटारे तुंबली आहेत, साईट पट्ट्यांची अवस्था दयनीय आहे, तिथे या कंपनीच्या डोळ्यांना मोतीबिंदू होतो का? टोल वसुलीत जी तत्परता दिसते, ती प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत का दिसत नाही? आज लोकांचा कोट्यवधींचा माल जप्त करून त्याचा ‘लिलाव’ मांडण्याची भाषा हे अधिकारी करत आहेत. आधी झाड वाढू द्यायचे आणि मग ते तोडून त्याचे लाकूड विकून स्वतःची घरे भरायची, हा कोणता न्याय?

आईच्या कानाचे लचके तोडणारी औलाद..!

एका मुलाने चोरी केली म्हणून पकडल्यावर त्याने आपल्या आईच्या कानाचा लचके तोडले होते, कारण आईने त्याला पहिल्या चोरीच्या वेळी टोकले नव्हते. आज आयआरबीच्या या अधिकाऱ्यांची अवस्था त्या आईसारखीच आहे. लोकांची ‘हिंमत’ तेव्हाच होते जेव्हा अधिकाऱ्यांचे ‘आशीर्वाद’ सोबत असतात. आता मोठे साहेब आले म्हणून हे छोटे अधिकारी ‘आडमुठेपणा’ दाखवत असतील आणि लोकप्रतिनिधींचे फोनही घेत नसतील, तर हा निव्वळ दांभिकपणा आहे!

आता तरी कारवाई होणार का..?

आमचा सडेतोड सवाल आहे की, या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन होणार की नाही? ज्यांच्या डोळ्यांसमोर हे साम्राज्य उभे राहिले, त्यांच्यावर आधी फौजदारी गुन्हे दाखल करा. नुसते गरीब जनतेचे बोर्ड पाडून मोठेपणा मिरवू नका. जनतेचा वाली कोणी नाही, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. पण लक्षात ठेवा, हा संताप उद्या वणवा होऊन पेटल्याशिवाय राहणार नाही!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!