मशिदीत घुमली विज्ञानाची गर्जना; भवानी पेठेत शिक्षणाचा नवा ‘क्रांतीचा’ नारळ फुटला..!


मशिदीत घुमली विज्ञानाची गर्जना ; भवानी पेठेत शिक्षणाचा नवा ‘क्रांतीचा’ नारळ फुटला !

पुणे : अहो, याला म्हणतात खरी क्रांती! जो समाज कालपर्यंत फक्त पोथी-पुराणात अडकला होता, आज तोच समाज मशिदीच्या पवित्र ओट्यावर बसून उद्याचा ‘कलेक्टर’ आणि ‘डॉक्टर’ घडवतोय, हे पाहून काळजाचं पाणी-पाणी होतंय. पुण्याच्या भवानी पेठेत काल केवळ मार्गदर्शन झालं नाही, तर तिथल्या वंचितांच्या नशिबाचा नवा अध्याय लिहिला गेला! निमित्त होतं ‘शिक्षण हक्क मंच’ आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिराचं.

आजवर आपण मशिदी आणि मदरसा म्हटलं की फक्त धार्मिक शिक्षण डोळ्यासमोर आणायचो. पण ‘शिक्षण हक्क मंच’ने या धारणेला चपराक दिली आहे. वंचितांच्या आणि गरिबांच्या पोरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मशिदीचा वापर ‘महाविद्यालया’सारखा करणं, हा एक क्रांतिकारी विचार आहे. ८ वी, ९ वी आणि १० वीच्या मुलांसाठी मोफत शिकवणीच नव्हे, तर थेट NEET, UPSC (फाउंडेशन), लॉ आणि CET सारख्या कठीण परीक्षांची तयारी तिथे करून घेतली जातेय, हे ऐकून छाती अभिमानानं फुलून येते!

कार्यक्रमाची सुरुवात प्रोफेसर मौलाना गुलाम नबी साहेबांच्या कुराण पठणाने झाली. वातावरणात एक पवित्रता दाटून आली होती. त्यानंतर मिस आयशा शेख यांनी ‘कायदा आणि UPSC’चं महत्त्व ज्या पद्धतीनं मांडलं, ते पाहून पटलं की आता आमच्या लेकी केवळ उंबरठ्यात बसणार नाहीत, तर त्या न्यायदानाचा गाडा चालवतील! श्री. चांदभाई बलबट्टी यांनी शिक्षणाचं महत्त्व विषद केलं. पण खरा रंग भरला तो मुख्य मार्गदर्शक श्री. रिझवान भोजानी यांनी! त्यांनी यशाची अशी काही उदाहरणं दिली की, उपस्थित पोरांच्या डोळ्यांत एक नवी चमक दिसू लागली. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचं काम भोजानींनी चोख बजावलं.

मतीन मुजावर आणि त्यांच्या या मंचानं जे कार्य हाती घेतलंय, त्याला तोड नाही! समाजातील सुशिक्षित वर्गाने मशिदींच्या माध्यमातून शैक्षणिक परिवर्तन घडवून आणलं पाहिजे, हा मुजावर यांचा विचार म्हणजे काळाची गरज आहे. “आपल्या मुलांना शिकवा, सक्षम होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे!” – हे वाक्य नुसतं वाचू नका, तर काळजात कोरून ठेवा. कारण जो समाज शिकतो, तोच टिकतो आणि जो टिकतो तोच इतिहास घडवतो! अशा या स्तुत्य उपक्रमाला आमचा मानाचा मुजरा!

– मतीन मुजावर

(शिक्षण हक्क डेवलपमेंट रिसर्च & प्रमोशन मंच)


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!